रविवार, 26 जुलाई 2020

ज्येष्ठ संस्कृतज्ञ डॉ प्रमोद लाळे यांचे निधन

ज्येष्ठ संस्कृतज्ञ डॉ प्रमोद लाळे यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली व एक मोठा विद्वान काळाच्या पडद्याआड गेल्याची जाणीव झाली.  त्यांच्याकडे पुण्यात असताना बरेचदा जाण्याचा योग आला . त्यांचं आयुष्य अध्ययन अध्यापन व संशोधनात गेलं. ते उस्मानिया विश्वविद्यालय (हैद्राबाद) येथे संस्कृत विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले.

डॉ लाळे यांनी उस्मानिया विश्वविद्यालय (हैद्राबाद) येथे 1979 साली 'मल्लिनाथाची साहित्यसंपदा' या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते.  त्यातील शोधनिबंधाचे ग्रंथ रूपात 'मष्टिनाथ-मनीषा' या शीर्षकार्थाचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. २२ विद्वानांनी शोधनिबंध सादर केले. हा शोध-निबंधांचा संग्रह  डॉ. प्र. ग. लाळे यांनी ग्रंथ स्वरुपात ‘मल्लिनाथ-मनीषा’ या नावाने प्रसिद्ध केला. त्यातील ९ निबंध संस्कृत भाषेत असून इतर तेलुगू आणि इंग्रजी भाषेत आहेत . मल्लिनाथ हा टीकाकार म्हणून इतका प्रसिद्ध होता की ‘मल्लिनाथी’ हा शब्द टीका याअर्थी मराठीत रूढ झाला आहे.

डॉ लाळे यांनी 'मल्लिनाथ' या प्रख्यात टीकाकारावर जो मोनोग्राफ साहित्य अकादमी साठी लिहिला त्याच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. त्यांचं अजून एक गाजलेले पुस्तक म्हणजे Curses and boons in the Vālmīki Rāmāyaṇa. वाल्मिकी रामायणातील शाप व वरदानांवर हे पुस्तक प्रकाश टाकते.

त्यांच्या निधनाने  त्यांच्यासोबत व्यतीत केलेल्या काही आठवणी जाग्या झाल्या.  2012 साली भारती विद्यापीठात मी तेव्हा रिसर्च फेलो म्हणून काम करत असे. डॉ विवेकानंद रणखांबे Vivekanand Rankhambe व  डॉ राजाराम झिरंगे Rajaram Zirange यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन प्रकल्प सुरू होता. अनेक नव्या गोष्टी शिकत होतो.  यावेळी रामायण महाभारताचा भारतीय इंग्रजी साहित्यावरील प्रभाव या विषयावर झालेल्या राष्ट्रीय परिषदेसाठी डॉ लाळे यांना व्याख्यानासाठी बोलावले होते.  डॉ शिरीष चिंधडे देखील व्यासपीठावर खालील फोटोत त्यांच्याशी बोलताना दिसत आहेत. माझ्या फेसबुक प्रोफाईलवर 2012 सालचे काही फोटों परत एकदा पोस्ट करत आहे. पंडित वसंतराव गाडगीळ देखील उपस्थित होते.




त्यांच्या कर्तृत्वाला कोटी कोटी वंदन.

गुरुवार, 23 जुलाई 2020

लोकमान्य टिळक लेख संग्रह संपादन: तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी



पुस्तकाचे नाव : लोकमान्य टिळक लेख संग्रह
 संपादन: तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
 प्रकाशक: साहित्य अकादमी
पृष्ठसंख्या 470

आज 23 एप्रिल, लोकमान्य टिळकांची जयंती.
त्यानिमित्ताने आज प्रस्तुत पुस्तक हे अत्यंत महत्त्वाचे असून लोकमान्य टिळकांनी केसरी या दैनिकात लिहिलेल्या लेखनाचा एक सुंदर ठेवा आहे. या पुस्तकाची प्रस्तावना मुळातून वाचण्यासारखे आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारख्या व्यासंगी विद्वानाने केसरी वृत्तपत्रातील लोकमान्यांची लेखन कला एकत्र संपादित करून आपणासारख्या वाचकांना मोठा नजराणा दिला आहे. तर्कतीर्थ प्रस्तावनेत असं लिहितात की , "टिळकांचे चरित्र म्हणजे विशाल द्रष्टेपणा व अदम्य कर्तेपणा यांचा भव्य संगम होय. टिळक चरित्र म्हणजे 1885 ते 1920 पर्यंतच्या आधुनिक भारताच्या इतिहासाचा गाभा होय .ते एक प्रत्यक्षात घडलेले महाकाव्य आहे. हे महाकाव्य साहित्य रुपात प्रकट करणारा प्रतिभासंपन्न चरित्रकार मात्र अजून झाला नाही. परंपरागत अध्यात्मिक भारतीय संस्कृतीच्या कुशीत जन्मलेला व आधुनिक संस्कृतीच्या सिंहीनीच्या स्तनाचे सकस दूध प्राशन केलेला हा "बाळ"आहे. या दुधाची त्यांनी आपल्या लेखनात अनेकदा विशेष प्रशंसा केली आहे. पहिल्या विद्यार्थी दशेतील विचारांच्या उष:काळात त्यांना भारतीय भावी स्वराज्याचे दिव्य स्वप्न दिसले. ते स्वप्न प्रत्यक्ष सृष्टीत पाहण्याचा जो ध्यास लागला या ध्यासाने सर्व टिळक जीवन अखेरपर्यंत भरले गेले. लोकशाही स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे भारतव्यापी अधिष्ठान निर्माण करणारे अग्रणी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कर्तृत्वाला सफल करणाऱ्या लोकशाही शक्तींना गांधींच्या पूर्वी जागृत करणारा दिव्य दिनमणी म्हणजे लोकमान्य टिळक होय .विद्यार्थी दशा संपल्यापासून अखेरपर्यंत सतत 45 वर्षे एकाच ध्येयाच्या दिशेने सर्व प्रकारे वैचारिक व सांसारिक मोह टाळून सतत संग्रामस्थ राहणे हाच टिळकांच्या द्रष्टेपणाचा अस्सल निकष आहे.

प्रस्तुत पुस्तकात लोकमान्य टिळकांनी केसरी मध्ये लिहिलेल्या लेखांचे सात वेगवेगळ्या विभागांमध्ये वर्गीकरण केले असून त्यांना अनुक्रमे खालील प्रमाणे नावे दिली आहेत
खंड 1-आधी सामाजिक की राजकीय
खंड 2-स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क
 खंड 3 -काँग्रेस अर्थात राष्ट्रीय सभा
खंड 4-हिंदू मुसलमान संबंध
 खंड 5-परतंत्र भारताच्या आर्थिक समस्या
खंड 6 शैक्षणिक प्रश्न व राष्ट्रीय शिक्षण
खंड 7 संकीर्ण (छत्रपती शिवाजी उत्सव ,गणेशोत्सव व राष्ट्रीय उत्सवाची आवश्यकता ,धर्म व तत्त्वज्ञान आणि प्रसिद्ध व्यक्ती व्यक्ती )

अशी शीर्षके दिली आहेत

 विशेष म्हणजे  या पुस्तकाच्या सातव्या खंडात स्वामी विवेकानंदांवर एक अप्रतिम लेख आहे स्वामी विवेकानंद समाधिस्त झाल्यावर केसरीमध्ये टिळकांनी हा लेख लिहिला तसेच ऋग्वेदाचे भाषांतर करणारा व जेष्ठ प्राच्यविद्या विद्वान प्रोफेसर मॅक्समुल्लर यांच्या मृत्यू नंतर टिळकांनी केसरी मध्ये लेख लिहिला आहे या दोन्ही लेखांचा अभिवाचन करून मी युट्यूब वर व्हिडिओ टाकला आहे तो जिज्ञासूंनी आवर्जून ऐकावा.

विवेकानंदांवरील लेखाची लिंक खालील प्रमाणे

https://youtu.be/wi4bKWx8czg

मॅक्समुल्लर यांच्यावरील लेखाची लिंक खालील प्रमाणे

https://youtu.be/3hafGzC6pCo

लोकमान्य टिळकांनी स्वामी विवेकानंद यांच्यावर केसरी वृत्तपत्रात लिहिलेला अग्रलेख

आज लोकमान्य टिळकांचा जन्मदिवस या निमित्ताने

1902 साली स्वामी विवेकानंदांच्या महानिर्वाणानंतर लोकमान्य टिळकांनी "केसरी"त लेख लिहिला. प्रस्तुत लेखात स्वामी विवेकानंदांच्या जीवनकार्याचा साक्षेपी आढावा लो टिळकांनी घेतला आहे. या लेखाचे अभिवाचन मी या व्हिडिओ मध्ये केले आहे. लो टिळकांच्या पावन स्मृतींना वंदन करण्यासाठी हा अभिनव प्रयोग. 

आवर्जून ऐका व अभिप्राय कळवा

चॅनल लाईक ,शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका


संकल्पना व अभिवाचन
डॉ प्रशांत धर्माधिकारी
साहाय्यक प्राध्यापक
जोशी बेडेकर महाविद्यालय

शुक्रवार, 10 जुलाई 2020

मुस्लिम मनाचा शोध :-शेषराव मोरे


मुस्लिम मनाचा शोध
शेषराव मोरे

 थोडसं पुस्तकाविषयी

मुस्लिम मन मुख्यतः इस्लाम मधून घडलेले आहे. मुस्लिम मनाचा शोध म्हणजे पर्यायाने इस्लामचा अभ्यास होय. इस्लामचा अभ्यास म्हणजे मूलतः हा तीन गोष्टींचा अभ्यास . मोहम्मद पैगंबर यांचे चरित्र , कुराण व हदीस. या तिन्ही गोष्टी परस्पर आधारित आहेत.  पैगंबर चरित्राचा अभ्यासाशिवाय कुराणातील आदेशांचा संदर्भ लागत नाही. हदीसचा अभ्यास केल्याशिवाय कुराणातील वचनांचा अर्थ कळत नाही. या तीन गोष्टी परस्परात एवढ्या गुंफलेल्या आहेत की त्या अविभक्त व एकजीव झालेल्या आहेत. या सर्वांचा एकत्रित व सर्वांगीण अभ्यास केला तरच इस्लामचे सम्यक आकलन होऊ शकते .असा अभ्यास करून बिगर मुस्लिम भारतीय लेखकाने लिहिलेला हा पहिलाच ग्रंथ आहे. हा ग्रंथ केवळ अभ्यासपूर्ण नसून तो वस्तुनिष्ठ पद्धतीने तटस्थ वृत्तीने व निष्पक्षपणे लिहिलेला आहे. हिंदू धर्माची प्रशस्ती इस्लाम वर टीका करण्यासाठी नसतानाही तो हिंदू वाद्यांना भावलेला आहे. इस्लामचा गौरव करण्यासाठी नसतानाही तो मुस्लीम पंडितांनी गौरवलेला आहे. समाजवाद्यांनाही तो अभिनंदनीय वाटलेला आहे. वस्तुतः या सर्वांना पसंत पडेल असा इस्लामवर ग्रंथ लिहिणे हेच एक आश्चर्य होते. म्हणूनच या ग्रंथाची अगोदर खाजगी स्वरूपाची अभिप्राय आवृत्ती काढलेली होती. हे आश्चर्याचा वास्तव बनून या ग्रंथाच्या रुपाने समोर आले आहे. 

भारतासारख्या बहुधर्मीय देशात सामंजस्य व राष्ट्रीय एकात्मता या मूल्यांसाठी परस्परांचे मन वरचे घडवणारे धर्म समजून घेऊन या मूल्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या भारतीय राज्यघटनेच्या मर्यादित आपापले धर्म कसे पाहता येतील यांचा विचार केला पाहिजे . हा ग्रंथ म्हणजे या दृष्टीने केलेला एक प्रयत्न आहे.
 
संदर्भ : मलपृष्ठ: मुस्लिम मनाचा शोध 
प्रकाशक:  संगत प्रकाशन, नांदेड

प्रत्येक मराठी भाषकाने आवर्जून वाचावा असा ग्रंथराज आहे।

बुधवार, 1 जुलाई 2020

कृष्णदयार्णव हरीवरदा- प्रथम अध्याय -शुक परीक्षित संवाद Krishna Dayarnav's Harivarada commentary Chapter: 1

कृष्णदयार्णव हरीवरदा- प्रथम अध्याय -शुक परीक्षित संवाद Krishna Dayarnav's Harivarada commentary Ch: 1
युट्युब लिंक खालीलप्रमाणे
कृष्णदयार्णव नावाचे अत्यंत महत्त्वाचे संत कवी महाराष्ट्रात सतराव्या शतकात होऊन गेले.  त्यांनी श्रीमद्भागवताच्या दशम स्कंदावर 42 हजार ओव्यांची "हरी वरदा" नामक दीर्घ टीका लिहिली आहे . दुर्दैवाने ती  म्हणावे तितकी प्रसिद्ध नाही.आपण  संत एकनाथांनी लिहिलेली एकादश स्कंदा वरील टीका, जिला वारकरी संप्रदायात एकनाथी भागवत म्हणतात, त्याचे वाचन नेहमी करतो.  प्रस्तुत व्हिडिओमध्ये
कृष्णदयार्णवांच्या हरीवरदा टीकेतील पहिल्या अध्यायातील निवडक भाग वाचून निरुपण केले आहे .
यामध्ये प्रामुख्याने भागवतातील मुळ कथा आहे.
परीक्षित राजा शिकारकरण्यासाठी वनात जातो. मृगया करून थकून शमीक ऋषींच्या आश्रमात जातो. ते ध्यानातमग्नअसतात.  त्यांनी अतिथी सत्कार केला नाही या रागाने मेलेला साप त्यांच्या गळ्यामध्ये घालून परीक्षित निघून जातो.  आपल्या वडिलांचा झालेला अपमान जेंव्हा शमीक ऋषींचा मुलगा शृंगी पाहतो तेव्हा तो परीक्षितिला शाप देतो की सातव्या दिवशी तक्षक नावाचा नाग परीक्षीतील येऊन दंश करेल.  हा शाप आपल्या मुलांनी दिल्याचं कळल्यावर शमीक ऋषीना खूप वाईट वाटतं. ते परीक्षित राजाला सांगतात की आज पासून सातव्या दिवशी तुझा मृत्यू येणार आहे. याप्रसंगी परिस्थितीला वैराग्य प्राप्त होते व आपला ज्येष्ठ पुत्र जनमेजय याला राज्यकारभार सोपवून परीक्षीतही प्रायोपवेशन करण्यासाठी गंगा नदीच्या पावन तीरावर येतो .तेथे  शुकाचार्यांचे आगमन होतं . त्यांच्या मुखातून श्रीमद्‍भागवताचे रसपान करुन परीक्षित राजा मुक्त होतो .असा मूळ कथा भाग आहे .या कथेचे सुंदर चिंतन कृष्णदयार्णव यांनी आपल्या ओवी छंदा मध्ये कसे केले आहे हे मुळातून वाचण्यासारखे आहे. हा  प्रसंग या व्हिडिओमध्ये मी निरूपण केली आहे
मागील भागात कृष्णदयार्णव हे कधी कोण होते व त्यांच्या चरित्राचा स्वतंत्र व्हिडिओ या चैनल वर अपलोड केला आहे तो जिज्ञासूंनी आवर्जून ऐकावा
लिंक खालीलप्रमाणे
"हरिवरदा"कार  कृष्णदयार्णव चरित्र Krishna Dayarnav Charitra
चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका

संकल्पना व निरूपण  डॉ. प्रशांत पुरूषोत्तम धर्माधिकारी

"हरिवरदा"कार कृष्णदयार्णव चरित्र Krishna Dayarnav Charitra



"हरिवरदा"कार  कृष्णदयार्णव चरित्र Krishna Dayarnav Charitra

श्रीमद्भागवतच्या दशम  स्कंधावर 42 हजार ओव्यांची टीका लिहिणारे महाराष्ट्रातील थोडेसे दुर्लक्षित असलेले संत कवी कृष्णदयार्णव यांचे स्थान मराठी साहित्यात मानाचे आहे . संत एकनाथांचा अनुग्रह स्वप्नामध्ये झाल्यावर त्यांनी भागवताच्या दशम स्कंधावर सुंदर मराठीत टीका लिहिली. ही टीका त्यांनी अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीच्या परिसरात बसून लिहिली असे म्हटले जाते. हा ग्रंथ साहित्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असून मराठी भाषेत घुसडलेले उर्दू फार्सी व परकीय शब्द न वापरता अस्सल देशी मराठी शब्द वापरून कृष्णदयार्णव यांनी मराठी भाषेला या हरीवरदा टीकेतून मोठीच भेट दिली आहे.

कृपया ऐकून अभिप्राय द्या

चॅनेल लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका

संकल्पना व अभिवाचन
डॉ प्रशांत धर्माधिकारी

भाषा ही जीवनमूल्यांचे संचित देते : पद्मश्री डॉ गणेश देवी

भाषा ही जीवनमूल्यांचे संचित देते : पद्मश्री डॉ गणेश देवी


ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयातर्फे कै डॉ वा ना बेडेकर स्मृती व्याख्यानमालेच्या 24 व्या व्याख्यानाचे पुष्प जेष्ठ भाषातज्ञ व विद्वान साहित्यिक पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी गुंफले. "भारतातील भाषांची विविधता व लोकशाही" या विषयावर हे व्याख्यान झाले. कै.डॉ. वा ना बेडेकर यांच्या जन्मशताब्दी प्रित्यर्थ सुरू झालेली ही व्याख्यानमाला म्हणजे ठाण्यातील संस्कृतीक अवकाशाची ओळख आहे. 

 भाषा रिसर्च फाउंडेशन , आदिवासी अकॅडमी तसेच पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थात्मक कामातून सर्वांना परिचित असलेले डॉ गणेश देवी हे भाषांच्या संवर्धनाचे काम करतात.  त्यांना त्यांच्या "आफ्टर  आम्नजिया" या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे . तसेच सार्क रायटर्स फाउंडेशन अवॉर्ड,  प्रिन्स क्लास अवॉर्ड व दुर्गा भागवत स्मृती पुरस्कार महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत. 

व्याख्यानाच्या सुरुवातीला आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक म्हणाल्या की प्रत्येक जण आपल्या परीने विश्वामित्र सारखी प्रतिसृष्टी निर्माण करत असतो . भाषेकडे पाहण्याची डोळस दृष्टी वृद्धिंगत होण्याची गरज डॉ नाईक यांनी अधोरेखित केली. त्यांनी डॉ गणेश देवी यांच्या कामाचा उल्लेख करत जमिनीवर राहून काम करण्याचे महत्त्व सांगितले.  क्रियाशील राहून विद्वत्तेच्या व ज्ञानदानाच्या कामात हिरीरीने भाग शिक्षण क्षेत्रातील लोकांनी घ्यावा असा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर डॉ प्रशांत धर्माधिकारी यांनी डॉ गणेश देवी यांच्या कार्याची सविस्तर ओळख करून दिली. 

डॉ गणेश देवी आपल्या व्याख्यानात म्हणाले की समाजाला पर्यावरणाच्या ऱ्हासाची आता जाणीव झाली आहे. मात्र तशीच जाणीव भाषेच्या बाबतीतही करून द्यावी लागेल . येत्या दोनशे वर्षात सर्व भाषा नष्ट होतील असे ते म्हणाले. पुढील तीस ते चाळीस वर्षात जगातील सहा हजार पैकी चार हजार भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर असून भारतातील सहाशे भाषांचा त्यात समावेश आहे. भाषा नष्ट झाल्यावर एक अत्यंत महत्त्वाचा वैचारिक संचिताचा ऐवज नष्ट  होतो.  विशेष करून सध्याच्या पिढीला बोली भाषा व मातृभाषांचे संवर्धन करण्याची गरज आहे. एखाद्या देशाची संस्कृती व चिंतन याचा एकत्रित अविष्कार म्हणजे ती भाषा असते. मात्र  इंग्रजी सारख्या भाषांचे आक्रमण भारतीय भाषांवर होऊन त्या आक्रसत चालले आहेत. त्यासोबतच भारतात असलेल्या अनेक बोलीभाषा व त्या भाषांमधून प्रकट होणारे सांस्कृतिक संचित आपण जपले पाहिजे असे डॉ गणेश देवी म्हणाले. पूर्वी एखाद्या पिढीचे सांस्कृतिक संचित हे ग्रंथालय व संस्थात्मक पायाभरणी यातून पुढच्या पिढीत हस्तांतरित होत होते. मात्र स्मृती साठवण्याचे महत्त्वाचे कार्य आपण कंप्यूटर व मशीन ला दिले आहे. त्यामुळे भाषा विरहित समाजाची निर्मिती होईल की काय असा धोका त्यांनी व्यक्त केला. 

भारतीय सिद्धांत व पाश्चात्य विचार परंपरा यांचा साकल्याने अभ्यास करून तौलनिक अभ्यास करण्याची गरज डॉ गणेश देवी यांनी व्यक्त केली .भाषा साहित्य व मानव्यविद्या शाखांमध्ये होणारे संशोधन  हे या दर्जाचे असावे असे ते म्हणाले . व्यक्तीने कुठल्या एका भाषेचा अभिनिवेश न ठेवता अधिकाधिक भाषा अवगत करण्यासाठी धडपड केली पाहिजे . कारण प्रत्येक नवी भाषा हा एक नवी सांस्कृतिक अवकाश दाखवणारा महत्त्वाचा बिंदू असतो. आपले चित्त व सभोवताली असलेल्या विश्वाला जोडणारा एकमेव सेतु म्हणजे भाषा आहे असे महत्त्वाचे विधान डॉ गणेश देवी यांनी केले. सभोवतालच्या परिस्थिती ची उकल आपणास भाषेच्या माध्यमातून होते त्यामुळे भाषेचे संवर्धन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे . मातृभाषेत दिलेले शिक्षण हे अधिक परिणामकारक असते व व त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे डॉ देवी म्हणाले.

या व्याख्यानमालेचे संयोजन वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभागाचे समन्वयक डॉ महेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रशांत पुरूषोत्तम धर्माधिकारी यांनी केले . तसेच तांत्रिक सहाय्य प्रा. प्राची नितनवरे व  प्रा मानसी जंगम यांनी केले.  हा कार्यक्रम ऑनलाइन आयोजित करण्यात आला . तसेच याचे थेट प्रक्षेपण फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून करण्यात आले.  या व्याख्यानास विद्यार्थी संशोधक व प्राध्यापकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

संपूर्ण वंदे मातरम चा अर्थ Meaning of Sampurn Vande Mataram

वन्दे मातरम् सुजलां सुफलाम् मलयजशीतलाम् शस्यश्यामलाम् मातरम्। शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम् फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम् सुहासिनीं सुमधुर भ...