गुरुवार, 23 जुलाई 2020

लोकमान्य टिळक लेख संग्रह संपादन: तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी



पुस्तकाचे नाव : लोकमान्य टिळक लेख संग्रह
 संपादन: तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
 प्रकाशक: साहित्य अकादमी
पृष्ठसंख्या 470

आज 23 एप्रिल, लोकमान्य टिळकांची जयंती.
त्यानिमित्ताने आज प्रस्तुत पुस्तक हे अत्यंत महत्त्वाचे असून लोकमान्य टिळकांनी केसरी या दैनिकात लिहिलेल्या लेखनाचा एक सुंदर ठेवा आहे. या पुस्तकाची प्रस्तावना मुळातून वाचण्यासारखे आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारख्या व्यासंगी विद्वानाने केसरी वृत्तपत्रातील लोकमान्यांची लेखन कला एकत्र संपादित करून आपणासारख्या वाचकांना मोठा नजराणा दिला आहे. तर्कतीर्थ प्रस्तावनेत असं लिहितात की , "टिळकांचे चरित्र म्हणजे विशाल द्रष्टेपणा व अदम्य कर्तेपणा यांचा भव्य संगम होय. टिळक चरित्र म्हणजे 1885 ते 1920 पर्यंतच्या आधुनिक भारताच्या इतिहासाचा गाभा होय .ते एक प्रत्यक्षात घडलेले महाकाव्य आहे. हे महाकाव्य साहित्य रुपात प्रकट करणारा प्रतिभासंपन्न चरित्रकार मात्र अजून झाला नाही. परंपरागत अध्यात्मिक भारतीय संस्कृतीच्या कुशीत जन्मलेला व आधुनिक संस्कृतीच्या सिंहीनीच्या स्तनाचे सकस दूध प्राशन केलेला हा "बाळ"आहे. या दुधाची त्यांनी आपल्या लेखनात अनेकदा विशेष प्रशंसा केली आहे. पहिल्या विद्यार्थी दशेतील विचारांच्या उष:काळात त्यांना भारतीय भावी स्वराज्याचे दिव्य स्वप्न दिसले. ते स्वप्न प्रत्यक्ष सृष्टीत पाहण्याचा जो ध्यास लागला या ध्यासाने सर्व टिळक जीवन अखेरपर्यंत भरले गेले. लोकशाही स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे भारतव्यापी अधिष्ठान निर्माण करणारे अग्रणी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कर्तृत्वाला सफल करणाऱ्या लोकशाही शक्तींना गांधींच्या पूर्वी जागृत करणारा दिव्य दिनमणी म्हणजे लोकमान्य टिळक होय .विद्यार्थी दशा संपल्यापासून अखेरपर्यंत सतत 45 वर्षे एकाच ध्येयाच्या दिशेने सर्व प्रकारे वैचारिक व सांसारिक मोह टाळून सतत संग्रामस्थ राहणे हाच टिळकांच्या द्रष्टेपणाचा अस्सल निकष आहे.

प्रस्तुत पुस्तकात लोकमान्य टिळकांनी केसरी मध्ये लिहिलेल्या लेखांचे सात वेगवेगळ्या विभागांमध्ये वर्गीकरण केले असून त्यांना अनुक्रमे खालील प्रमाणे नावे दिली आहेत
खंड 1-आधी सामाजिक की राजकीय
खंड 2-स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क
 खंड 3 -काँग्रेस अर्थात राष्ट्रीय सभा
खंड 4-हिंदू मुसलमान संबंध
 खंड 5-परतंत्र भारताच्या आर्थिक समस्या
खंड 6 शैक्षणिक प्रश्न व राष्ट्रीय शिक्षण
खंड 7 संकीर्ण (छत्रपती शिवाजी उत्सव ,गणेशोत्सव व राष्ट्रीय उत्सवाची आवश्यकता ,धर्म व तत्त्वज्ञान आणि प्रसिद्ध व्यक्ती व्यक्ती )

अशी शीर्षके दिली आहेत

 विशेष म्हणजे  या पुस्तकाच्या सातव्या खंडात स्वामी विवेकानंदांवर एक अप्रतिम लेख आहे स्वामी विवेकानंद समाधिस्त झाल्यावर केसरीमध्ये टिळकांनी हा लेख लिहिला तसेच ऋग्वेदाचे भाषांतर करणारा व जेष्ठ प्राच्यविद्या विद्वान प्रोफेसर मॅक्समुल्लर यांच्या मृत्यू नंतर टिळकांनी केसरी मध्ये लेख लिहिला आहे या दोन्ही लेखांचा अभिवाचन करून मी युट्यूब वर व्हिडिओ टाकला आहे तो जिज्ञासूंनी आवर्जून ऐकावा.

विवेकानंदांवरील लेखाची लिंक खालील प्रमाणे

https://youtu.be/wi4bKWx8czg

मॅक्समुल्लर यांच्यावरील लेखाची लिंक खालील प्रमाणे

https://youtu.be/3hafGzC6pCo

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

संपूर्ण वंदे मातरम चा अर्थ Meaning of Sampurn Vande Mataram

वन्दे मातरम् सुजलां सुफलाम् मलयजशीतलाम् शस्यश्यामलाम् मातरम्। शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम् फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम् सुहासिनीं सुमधुर भ...