रविवार, 28 जुलाई 2019

No Man's Land Film 2001

विद्यार्थ्यांनी चित्रपटसाक्षर झालं पाहिजे: सुधीर नांदगावकर 27 जुलै रोजी जोशी बेडेकर फिल्म सोसायटीच्या वतीने "नो मॅन्स लँड" या 2001 साली ऑस्कर पारितोषिक प्राप्त झालेल्या चित्रपटाचे सादरीकरण झाले. फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ चित्रपट समीक्षक श्री सुधीर नांदगावकर याची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक यांनी फिल्म सोसायटीतर्फे दाखवण्यात येणाऱ्या नवनवीन चित्रपटाचे शास्त्रीय विश्लेषण करून सहृदय प्रेक्षक घडवण्यात योगदान करण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष श्री सुधीर नांदगावकर यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. जोशी बेडेकर कॉलेज फिल्म सोसायटी ही ठाण्याच्या सांस्कृतिक अवकाशात मोलाची भर घालणारी सोसायटी असून डॉ विजय बेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे अविरत पणे काम करत आहे असे गौरवोद्गार त्यांनी याप्रसंगी काढले. एकूणच भारतीय चित्रपटाचे ऑस्करसाठी नामांकन होताना व अंतिम फेरीत ऑस्कर मिळताना नेमक्या कुठल्या बाबी लक्षात घेण्यात येतात यासंदर्भात श्री नांदगावकर यांनी भाष्य केले. डेनिस टोनोव्हीक यांनी दिग्दर्शन केलेला 2001 साली ऑस्कर मिळालेला "नो मॅन्स लँड" या चित्रपटाला ऑस्कर का मिळाले याची त्यांनी चिकित्सा केली. हा चित्रपट बॉसनिय व सरबिया या दोन राष्ट्रांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित असून एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या सर्बिया व बॉसनीया या राष्ट्रांचे दोन सैनिक एका खंदकात अडकतात व त्यांच्या जीवावर बेतलेल्या या प्रसंगातून युद्धाची चिकित्सा करतात. यु एन च्या शांतिसेनेच्या कार्यप्रणालीवर देखील हा चित्रपट भाष्य करतो. या युद्धाचे वार्तांकन करणारी लिव्हिंगटन नावाची महिला पत्रकार सर्वांचे लक्ष वेधून घेते. एकूणच युद्धाने कुठलेच प्रश्न सुटत नाहीत असा सल्ला हा चित्रपट देऊन जातो. चित्रपटाचे सादरीकरण झाल्यास विद्यार्थ्यांनी चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त केले. फिल्म सोसायटीचे समन्वयक डॉ प्रशांत धर्माधिकारी यांनी विल्फ्रेड ओवेन या कवीच्या " स्ट्रेंज मिटिंग" या कवितेचा दाखला देत चित्रपटाच्या युद्धविषयक काही प्रसंगावर भाष्य केले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा सुभाष शिंदे, ग्रंथपाल नारायण बारसे , जनसंज्ञापन विभागाचे समन्वयक डॉ महेश पाटील तसेच बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहन पिंगळे यांनी केले.

गुरुवार, 25 जुलाई 2019

मानवी कल्याण हाच कलेचा हेतू : पद्मश्री डॉ वामन केंद्रे दि 19 जुलै,2019 रोजी ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात डॉ वा ना बेडेकर स्मृती व्याख्यानमालेचे 19 वे पुष्प ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ वामन केंद्रे यांनी क " जीवन आणि नाटक" या विषयावरील व्याख्यानाने गुंफले. ठाण्याच्या सांस्कृतिक अवकाशात मोलाची भर घालणाऱ्या विद्या प्रसारक मंडळाचे अध्वर्यू राहिलेल्या स्वर्गीय डॉ वा ना बेडेकर यांच्या तपस्वी जीवनाला श्रद्धांजली म्हणून ही व्याख्यानमाला जोशी बेडेकर महाविद्यालयाने आयोजित केली आहे. या प्रसंगी डॉ वामन केंद्रे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या "युवशिल्प" या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक यांनी ज्येष्ठ नाटककार अतुल पेठे यांच्या "नवनिर्मीतीचे बोन्साय होण्याच्या काळात" या लेखाचा उल्लेख करत एकूणच भारतीय रंगभूमीच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. या वेळी युवाशिल्पचे संपादक प्रा संतोष राणे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ वामन केंद्रे आपल्या "जीवन आणि नाटक" या विषयावरील व्याख्यान देताना म्हणाले की, भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथात नाटकाच्या सादरिकरणासोबतच त्याच्या प्रयोजनाबद्दलही स्पष्ट उल्लेख आहेत. रसिकपेक्षकांना मिळणारी सौंदर्यानुभूती हा नाटकाचा खरा परिपाक आहे. ते म्हणाले की 'ज्याच्या जगण्यात नाटक नाही त्यासारखा सपक जीव या धरतीवर नाही'. डॉ केंद्रे पुढे म्हणाले की, आपलं जगणं एकसुरी होत असून त्या चाकोरीबद्ध जीवनाच्या पलीकडे मानवी संवेदनांना नेणं हेच नाटकाचं काम आहे. साहित्य, संगीत, कला, नाटक याची जाण नसणाऱ्या समाजाचे कितीही आर्थिक उत्थान झाले तरी सर्वांगीण विकास होत नाही. जीवन हे क्षणिक आहे व एकदाच मिळाले आहे या पाश्चात्य वैचारिक धारणेतून समाजाला लागलेली सुख ओरबाडण्याची सवय घातक आहे. यावर उपाय भारतीय परंपरेतच आपणास सापडतो असे ते म्हणाले. मानवी कल्याण हाच कलेचा हेतू असून समाजात वाढत चाललेले सवंगिकरण हा मोठा चिंतेचा विषय आहे असे ते म्हणाले. स्वतः वर निर्भेळ पणे हसू शकणे हे चांगल्या समाजाचे लक्षण आहे. महाराष्ट्रात जेवढ नाटकावर प्रेम करण्यात येत तेवढं सहसा कुठेच होत नाही असे डॉ केंद्रे आवर्जून म्हणाले. रोज नवा उत्सव म्हणजे नाटक असं म्हणत आपल्या " झुलवा" 'रणांगण' "मध्यमव्ययोग" "मोहें पिया" आदी नाटकांचा संदर्भ डॉ केंद्रे यांनी आपल्या व्याख्यानात दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रशांत धर्माधिकारी यांनी केले तर संयोजन वृत्तविद्या विभागाचे समन्वयक डॉ महेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

संपूर्ण वंदे मातरम चा अर्थ Meaning of Sampurn Vande Mataram

वन्दे मातरम् सुजलां सुफलाम् मलयजशीतलाम् शस्यश्यामलाम् मातरम्। शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम् फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम् सुहासिनीं सुमधुर भ...