ठाणे कॉलेज परिसरात बळाचा वापर करून व कॉलेज प्रशासनाला विचारात न घेता विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी कॉलेज अधिग्रहित करण्याची बातमी प्रसारमाध्यमात पाहून खूप वाईट वाटले. सत्तालोलुप अधिकारशाहीची मिजास सर्वथा चुकीची आहे.
विद्या प्रसारक मंडळाचा परिसर हा "ज्ञानद्वीप " नावाने प्रसिद्ध आहे. ठाण्याचे सांस्कृतिक संचित या संस्थेने घडवले आहे. साधारणतः 15 हजार विद्यार्थी इथे शिक्षण घेतात. त्यांच्या निकालाचे काम सुरू असताना अशी अचानक कार्यवाही प्रशासनाने करावयास नको होती. डॉ बेडेकरांची व त्यांच्या कुटुंबाची सामाजिक बांधीलकी संपूर्ण ठाण्यातील जनता जाणते. त्यांनी उभं केलेलं हे शैक्षणिक संकुल संस्कार व मूल्यशिक्षणात मानबिंदू आहे. मात्र याचा कुठलाही विचार न करता अधिकारांचा गैरवापर करून तारतम्यविहीन वागणुकीचा निषेध केला गेला पाहिजे.
भारतात एक काळ असा होता की, दुष्यंत राजसारखे चक्रवर्ती सम्राट कण्व मुनीच्या आश्रमात प्रवेश करताना राजपोशाख काढून मुनिवेशात प्रवेश करत असत. कालिदासाने आपल्या अभिज्ञान शाकुंतल नाटकाच्या पहिल्या अंकात राजाने आपल्या राज्यातील शैक्षणिक संस्थांशी केलेला राजव्यवहार अचूकपणे टिपला आहे.
दुष्यंत राजा कण्व मुनींच्या आश्रमात प्रवेश करताना आपल्या सारथ्यास म्हणतो
"तपोवन निवासीनाम् उपरोधो मा भूत। विनीतवेशेन प्रवेष्टव्यानि तपोवनानि नाम। "
अर्थात आपण गुरुकुलात प्रवेश करताना आपला रथ , घोडे व शस्त्र बाहेर ठेवून "विनीत वेषात" अर्थात साधे कपडे घालून प्रवेश करू. आपल्या मुळे तपस्वी विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये.
पुणे विद्यापीठात इंग्रजी साहित्याचे पदव्युत्तर शिक्षण घेताना ऐकलं होतं की, बॅरिस्टर जयकर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असताना पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान म्हणून कार्यक्रमास येणार होते. येण्यास त्यांना विलंब झाला. कार्यक्रम वेळेत सुरू झाला होता. तेंव्हा ते कुलगुरू जयकरांच्या पायावर डोकं ठेवत नेहरूंनी माफी मागितली. शिक्षण संस्थांचा व त्यातील गुरुजनांचा सन्मान यातून अधोरेखित होतो.
राहत इंदोरी या प्रसिद्ध उर्दू शायराचा एक प्रसिद्ध शेर आहे
जो आज साहिबे मसनद है , कल नही होंगे।
किरायेदार है, जाती मकान थोड़ी है।
अर्थात आज जे (साहिबे मसनद)
अधिकार पदावर बसले आहेत त्यांना हे कळत नाही की आपण किरयादार आहोत. आपण इथे दीर्घकाळ राहणार नाहीत. ही काही आपली पर्सनल प्रॉपर्टी नाही
सत्तेने नेहमी ज्ञानदान करणाऱ्या संस्थांना ललामभूत मानलं. मात्र आज काळ एवढा बदलला की एखादी संस्था जणूकाही अवैध धंदे चालू असलेल्या ठिकाणाला पोलिसी खाक्या दाखवून अधिग्रहित करतात त्याप्रमाणे धाकदपटशा दाखवून घेतली जाते. शिक्षण ही धोरण कर्त्यांची व प्रशासनाची प्राथमिकता नाही हेच यातून दिसते. जॉन ऍकटन (1834-1902) या प्रसिद्ध ब्रिटिश इतिहासकाराने म्हटले आहे की, Power tends to corrupts, and absolute power corrupts absolutely".
इतिहासाच्या पुस्तकात प्लेगची साथ व इंग्रजी सोजिरांची जुलमी वागणूक वाचली होती. तीच मिजास जर आपल्या प्रशासनात बसलेल्या लोकांची असेल तर शिक्षणाचे व शिक्षणसंस्थाचे पावित्र्य टिकणार नाही. 'विद्या ददाति विनयं" असं लहानपणी वाचलं होती. विद्या विनय देते म्हणे, मात्र विद्यासंपन्न, धनसंपन्न व अधिकार संपन्न व्यक्तींनी आपल्याच पुढच्या पिढीची आधुनिक तीर्थक्षेत्रे असलेल्या शिक्षणसंस्थांची काळजी मोठ्या विनयाने घ्यावी ही सामान्य नागरिकांची इच्छा असते. या मूलभूत जीवनमूल्यालाच पायदळी तुडवले जात असेल तर भविष्य खूप चांगले आहे असे म्हणता येणार नाही.
डॉ प्रशांत धर्माधिकारी
साहाय्यक प्राध्यापक
जोशी बेडेकर महाविद्यालय
ठाणे
https://www.lokmat.com/thane/fear-thane-college-benches-worth-lakhs-getting-damaged-due-rain-a301/
ठाणे काँलेजचे लाखोंच्या किमतीचे बेंच पावसात भिजून खराब होण्याची भीती
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें