सोमवार, 1 जून 2020

स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता

स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता 

28 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १३७ वी जयंती जगभर साजरी झाली . यानिमित्त त्यांच्या काव्याप्रतिभेवर प्रकाश टाकणारा डॉ प्रशांत धर्माधिकारी यांचा लेख 
-------- 

28मे 2019 रोजीचा लंडन येथील फोटो


‘मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन’ अशी वयाच्या पंधराव्या वर्षी प्रतिज्ञा घेणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवन म्हणजे भारतीयांसाठी एक मोठा उर्जेचा स्त्रोत आहे. त्यांची १३७ वी जयंती २८ मे रोजी जगभर साजरी केली जाते. इंग्रजी राजवटीपासून भारताची मुक्तता करण्यासाठी चालवलेल्या क्रांतिकारी चळवळीचे अग्रदूत म्हणून सावरकरांचे योगदान मोठे आहे. चाफेकर बंधूना झालेल्या फाशीच्या शिक्षेचा कोवळ्या वयातील सावरकरांवर मूलगामी परिणाम झाला. सशस्त्र क्रांती, बलोपासना, स्वदेशी, राष्ट्रप्रेम इत्यादी विषयांवर सावरकरांची अगाध श्रद्धा होती. लोकमान्य टिळकांना त्यांनी मनोमन आपले गुरुपद बहाल केले होते. सावरकर हे केवळ स्वातंत्र्यवीर नव्हते तर एक महाकवी, भाषाशास्त्रज्ञ, भाषाशुद्धी चळवळीचे प्रणेते, नाटककार, कथा, लेखक, वक्ते व दार्शनिक होते. सावरकरांची कविता बहुप्रसवा होती. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी ‘श्रीमंत सवाई माधवराव’ यांच्यावर फटका लिहिला व वयाच्या १५ व्या वर्षी ‘स्वदेशीचा फटका’ लिहिला. १९६५ साली प्रकाशित झालेल्या ‘समग्र सावरकर वाङमय’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हटलं आहे कि, ‘सावरकरांचे काव्य हे जीवनात प्रतिभेतून निर्माण झालेले असून त्यांच्या कोणत्याही चार स्फुट कविता घेतल्या तरी महाराष्ट्रातील नामवंत कवीत त्यांची अग्रस्थानी गणना होऊ शकेल. त्यांनी अनेक विषयांवर कविता लिहिल्या असून त्याची प्रत्येक कविता देशप्रेमाने ओथंबलेली , वीररसाने भरलेली, प्रतिभेच्या विपुलतेने चमकणारी आणि तत्वज्ञान व ध्येयवाद यांचा उद्घोष करणारी असून महाकवीच्या कोणत्याही कसोटीवर विचार करताना स्वा सावरकरांना महाकवी हेच विशेषण योग्य ठरते.’ १० नोव्हेंबर १९५० च्या दैनिक काळ च्या दिवाळी अंकात नोंदवले आहे की, महाकवी हे उपपद एखाद्या कवीस दोन अर्थानी लावतात, एक, ज्याची प्रतिभा उज्ज्वल व जो जीवनाचे भव्योदात्त दर्शन घडवितो तो महाकवी किंवा, जो महाकाव्य(EPIC)नावाचा काव्यप्रकार रचतो तो. पहिल्या अर्थी शेक्सपिअर, भवभूती, नि बाण यांना महाकवी म्हणतात. दुसर्या अर्थी महाकाव्य लिहिणारे टासो, माघ, भारवी, श्रीहर्ष इत्यादींना महाकवी म्हणतात. सावरकर या दोन्ही अर्थी महाकवी आहेत ‘कमला’ या महाकाव्याची रचना करताना सावरकरांनी ‘वैनायक’ या विशेष वृत्ताची निर्मिती केली. मराठी भाषेच्या काव्यात्म जाणीवेस वैनायक हा सुंदर नजराणा आहे. सावरकरांची संपूर्ण कविता सुमारे १३,५०० ओळींची भरेल. सावरकरांची कविता या नावाने त्यांची कविता १९४३ साली प्रकाशित करण्यात आली आहे. त्यांनी ‘उ:शाप’, ‘सन्यस्त खड्ग’ व ‘उत्तरक्रिया’ अशी तीन संगीत नाटके लिहिली. आजही सावरकरांनी लिहिलेली ‘ शतजन्म शोधिताना’ , ‘मर्मबंधातली ठेव ही’ इत्यादी नाट्यपदे मोठ्या रसिकपणे गायिली जातात. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. स . ग. मालशे म्हणतात कि, “ मिल्टन सारखी पारंपारिक उपमा, रूपके रचावी सावरकरांनीच. त्यांच्या भावना जेव्हा कोमल, अगदी हळव्या बनतात तेंव्हा त्यांचे शब्दरूप महाकवीच्या प्रासादिक वाणी प्रमाणे आविष्कृत होते. ‘सांत्वन’ मधल्या ओव्या किंवा ‘कि घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने ‘ ह्या सारखे श्लोक व्यास वाल्मिकींच्या, श्रीधर –मुक्तेश्वरांच्या वाणी सारखे दिव्य आणि प्रासादिक वाटतात. सावरकरांनी आर्या, शार्दुलविक्रिडीत, इंद्रवज्रा, वसंततिलका इत्यादी वृत्त चपखलपणे कवितेत वापरले आहेत. त्यांनी लिहिलेली ‘श्री टिळक स्तवन ‘ ही आर्यावृत्ताचा अजोड नमुना आहे. १९०२ साली सावरकर फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थी असताना ‘आर्य संघ’ साठी दर आठवड्याला म्हणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांवर ‘जय देव जय देव जय जय शिवराया’ ही आरती लिहिली. पोवाडा, फटका, आदि काव्यप्रकारांसह सावरकरांनी वीर रसा बरोबरच शृंगार देखील सिद्धहस्तपणे हाताळला आहे. आपला मुलगा प्रभाकर हा लहानपणीच वारला तेंव्हा सावरकर लंडन मुक्कामी होते. तेव्हा त्यांनी ‘प्रभाकरास’ नावाची कविता पुत्र स्नेहाने दु:खगद्गद होऊन लीहिली. ही कविता सावरकरांनी आपल्या ‘ शिखांचा इतिहास’ या ग्रंथाला अर्पणपत्रिका म्हणून लिहिली. १९०६ साली कायद्याची पदवी घेण्यासाठी सावरकर इंग्लंडला रवाना झाले. त्यावेळी बोटीने समुद्र प्रवास करताना प्रियजनांचा विरहाला मुखरित करीत ‘सुनील नभ हे सुंदर नभ हे’ ही कविता लिहिली. १९०९ साली ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर सावरकरांनी ‘सागरा प्राण तळमळला’ हि अजरामर कविता लिहिली. त्यात ते म्हणतात की ‘नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा मज भरतभूमीचा तारा प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी’ ‘सांत्वन’ व ‘माझे मृत्युपत्र’ या दोन उर्जस्वल कविता सावरकरांच्या लेखणीतून लंडन वास्तव्यात मूर्त झाल्या. या दोन्ही कविता त्यांनी आपल्या वहिनींना उद्देशून लिहिल्या असून ह्या कविता म्हणजे सावरकरांच्या काव्यप्रतिभेचा कळस आहे. माझे मृत्युपत्र या कवितेत सावरकर लिहितात की जर आम्ही सात भाऊ असतो तरीही त्या सर्वांनी देशसेवेसाठी प्राणार्पण केले असते. हे मातृभूमी तुजला मन वाहियेले वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले तुतेची अर्पिली नवी कविता रसाला लेखाप्रती विषय तूची अनन्य झाला सावरकरांच्या कवितेचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे ते आपली कविता मातृभूमीच्या मुक्तीसाठी अर्पण करतात. त्यांच्यासाठी मातृभूमीपेक्षा श्रेष्ठ काहीच नव्हतं. त्यांच्या बद्दल असं म्हटलं जात असे की ‘If at all there was any sweetheart in his life, that was his motherland’ सावरकरांची इंग्रजी कवितेची जाण देखील उच्च दर्जाची होती. त्यांनी लिहिलेली ‘The Revolutionist to Himself’ ही कविता त्यांचावरील असलेल्या ज्येष्ठ इंग्रजी कवी जॉन मिल्टन चा प्रभाव दाखवते. इंग्रजी, संस्कृत, मराठी सोबतच त्यांचे उर्दू भाषेवर देखील प्रभुत्व होते. हिंदुत्वाची व्याख्या करणारा व संस्कृत प्रचुर मराठी वापरणारा सावरकरांसारखा एक तत्वज्ञ जेंव्हा उर्दू भाषेचा साज आपल्या काव्याप्रतीभेस चढवतो तेंव्हा त्यांच्या तरल भावाविश्वाचे दर्शन होते. २०१३ साली अभ्यासकांना सावरकरानी लिहिलेल्या काही उर्दू गझल सापडल्या. त्यातील काही शेर असे: यही पाओगे मेहशरमें जबां मेरी, बयाँ मेरा मैं बंदा हिंदवाला हूँ, यही हिंदोस्ताँ मेरा मेरा है रक्त हिंदी, जात हिंदी, ठेठ हिंदी हूँ यही मजहब, यह फिर्का, यही हैं खानदाँ मेरा विशेष म्हणजे १९३८ साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना सावरकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भाषाशुद्धी, लिपिशुद्धी ह्यांचे महत्व सांगितले. साहित्याचे वस्तुनिष्ठ व रसनिष्ठ असे दोन भाग कल्पून त्याचे विवरण करत भाषणाच्या अखेरीस लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या’ असा परखड विचार मांडला. देशसेवेचे वृत्त हे सतीचे वाण म्हणून स्वीकारलेला हा कवी ‘तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण’ असा उद्घोष करतो. आजच्या जगात देखील साहित्यिक व कवींच्या समोर असलेल्या आव्हानांना मोठी दिशा देणारी स्वातंत्र्यवीरांची लेखणी व काव्यसंपदा आपल्याला दीपस्तंभासारखी भारताच्या उर्जस्वल भविष्याची साक्ष देत राहते.



 *** डॉ प्रशांत पुरुषोत्तम धर्माधिकारी


 28 मे रोजी खालील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात महाराष्ट्रातील तरुणाईला संबोधित करता आला याचा अभिमान वाटतो 
:::::::

 *स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त #FacebookLive* @ABVPKonkan 
 विषय:- *"स्वातंत्र्यवीर सावरकर: एक बहु आयामी कवी"

 वक्ता:- *डॉ. प्रशांत धर्माधिकारी*
(सहाय्यक प्राध्यापक, वृत्तपत्र व संज्ञापन विभाग, जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे)

 *२८ मे २०२० | सायं. ६:०० वा*

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

परममित्र प्रकाशनाच्या श्री माधव जोशी यांचं दु:खद निधन

परममित्र प्रकाशनाचे PARAM MITRA Publications  श्री माधव जोशी यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे.  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ...