सोमवार, 1 जून 2020

करोनोत्तर उच्च शिक्षणातील नवे प्रवाह

करोनोत्तर उच्च शिक्षणातील नवे प्रवाह डॉ प्रशांत पुरुषोत्तम धर्माधिकारी करोना लॉक डाऊन च्या काळात शिक्षण हे अत्यावश्यक सेवांमध्ये मोडत नाही हे वास्तव समोर आले. हे खूप दुर्दैवी आहे. " वर्क फ्रॉम होम "ही संकल्पना शिक्षण क्षेत्रात अजून म्हणावी तेवढी रुजली नाही. हे होण्याचे कारण म्हणजे भारतात अध्ययन अध्यापनाचा परंपरागत दृष्टिकोन. शिक्षकांनी निर्धारित विषय व अभ्यासक्रम परीक्षेच्या दृष्टिकोनातून शिकवावा ही अपेक्षा विद्यार्थी व एकूणच व्यवस्थेची असते. त्यामुळे वर्षानुवर्षे तोच तो अभ्यासक्रम, काही सुविद्य अपवाद वगळता , रटाळ पद्धतीने 'संपवला' जातो. असं दिसतं की विद्यार्थ्यांना परीक्षेचा कंटाळा आला आहे. परीक्षा घेण्याच्या पद्धतीचा किंवा एकूणच परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या रटाळ प्रश्नांचा उबग आला असावा असे वाटते. मात्र लॉकडाऊन च्या काळात विद्यार्थी घरीच बसून इतके वेगवेगळे उपक्रम करत आहेत. शिक्षकांना सुद्धा झूम, गुगल मीट, व्हिडीओ कॉल या माध्यमातून लेक्चर घेताना वेगळाच फील येतोय. उच्च शिक्षणातल्या रेट्यामुळे का होईना वेबिनार, एफ डी पी चे सेशन्स प्राध्यापक करत आहेत. करोनोत्तर जगात डिजिटल कौशल्य अद्ययावत असण्याची अपरिहार्यता यामागे आहे. आपण स्पर्धेत मागे पडू ही भीती आहे. लॉक डाऊन च्या काळात विद्यार्थ्यांशी नियमित संवाद साधताना त्यांच्यासोबत झालेल्या चर्चांमधून व माझ्या वयक्तिक परदेशी विद्यापीठांच्या अभ्यासदौऱ्यातील अनुभवांवरून करोनोत्तर उच्चशिक्षण कसे असेल यावर काही मुद्दे खालीलप्रमाणे मांडता येतील. 1.करोनोत्तर अभ्यासक्रम तयार करताना त्याची उद्देशिका (Mission Statement) ही संपूर्ण पणे वेगळी असेल. शिक्षण थेरोटीकल शिकवण्यापेक्षा डिजिटल मॉड्युल्स तयार करून व ई- रिसोर्स देऊन बनवावे लागतील. मी इंग्रजी विषयाचा प्राध्यापक असल्याने भाषेचे उदाहरण देईन. इंग्रजी संभाषण क्षमता आत्मसात करण्यासाठी सद्य प्रचलित अभ्यासक्रमात थेरोटीकल गोंष्टींचा भरणा जास्त आहे मात्र भाषा अवगत करण्यासाठी त्या भाषेतील गोष्टींचे श्रवण Listening skills कडे दुर्लक्ष होते. या उलट रोज 20 मिनिटे इंग्रजीतील टेड स्पिचेस वर्गात मोठ्या आवाजात ऐकवली तर विद्यार्थी एका महिन्याच्या आत इंग्रजी बोलतात. आपण भाषेबद्दल शिकवतो भाषा शिकवत नाही. व्याकरणशिकवण्यापेक्षा त्या भाषेतील उच्चदर्जाचे साहित्य शिकवण्याच्या अनुभवातून भाषा शिकता येते. 2. करोना लोकडाऊन मध्ये सर्व क्षेत्र ठप्प आहेत मात्र डिजिटल व आय टी क्षेत्र हे मोठ्या (ऐटीत) तेजीत होती. आजसुद्धा ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर एडीएक्स, कोर्सेरा इत्यादी संकेतस्थळांनी करोना लॉक डाऊन स्पेशल कोर्सेस अत्यल्प पैशात सुरू केले आहेत. अभियांत्रिकी, विधी, विज्ञान, साहित्य, भाषा आशा अनंत विषयावर कमीत कमी 1 दिवस ते 4 आठवडे या कालावधीत संपणारे अभिनव अभ्यासक्रम एमआयटी व हार्वर्ड या अमेरिकेतील लब्धप्रतिष्ठित विद्यापीठांनी Edx.org या प्लॅटफॉर्म वर सुरू केले आहेत. कुठल्याही अभ्यासक्रमाला कमीत कमी 1हजार ते 30 हजार विद्यार्थी नाव नोंदवतात. त्यातही दोन प्रकार आहेत. तुम्ही तो कोर्स विनामूल्य पूर्ण करू शकता किंवा अगदी50 ते 100 डॉलर मध्ये कोर्सचे त्या विद्यापीठाचे सर्टिफिकेट मिळवू शिकता. उदाहरणार्थ मी edx.org या प्लॅटफॉर्म वर William Shakespeare: Life and Works हा हार्वर्ड विद्यापीठाचा 4 आठवड्याचा कोर्स करत आहे. या कोर्सला नाव नोंदवणारा मी 20,345 वा विद्यार्थी आहे. मला सर्टिफिकेट साठी फक्त 49 डॉलर अर्थात 3780 रुपये भरावे लागले. मात्र मला हार्वर्डचे सर्टिफिकेट मिळणार व तेही भारतात बसून. सोबत वरील विषय शिकवणारा स्टीफन ग्रीनब्लाट हा अमेरिकेतील शेक्सपिअर या विषयावरचा ख्यातकीर्त अभ्यासक आहे . 3. परीक्षा पद्धतीत सकारात्मक बदल करावे लागतील. उदाहरणार्थ edx.org या प्लॅटफॉर्मवर परीक्षा ही अभिनव पद्धतीने घेण्यात येते. ऑनलाइन डॅशबोर्ड तयार करून अभ्यासक्रमाला नाव नोंदवलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन चर्चा एकत्रपणे करता येते. कल्पक प्रकल्प ( असाईनमेंट) देऊन त्याचे मूल्यमापन प्रथम आपले सहाध्यायी करतात (Peer evaluation). या डॅशबोर्डवर शिक्षक वेळप्रसंगी आशयाचे नियमन करतो व ग्रेडिंग करतो. शिक्षकाने दिलेल्या व्हडिओ लेक्चर वर आधारित 300 वा500 शब्दात उत्तर लिहिण्यासाठी असाईनमेंट दिली जाते . कोर्स समाधानकारक रित्या पार पडल्यास प्रमाणपत्र मिळते. सध्या भारतात लॉकडाऊनच्या काळात वेबिनारचे पीक आले आहे. एरव्ही जे वर्गावर जाऊन बोलणार असतो ते आपल्या गॅलरीत बसून बोलणे म्हणजे वेबिनार नाही. अध्यापनाचा आशय डिजिटली बदलत नाही तोपर्यंत ते व्याख्यान रोचक होत नाही 4. करोनोत्तर काळात परदेशात शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा कमी होईल असे वाटते. किंवा असे अभ्यासक्रम अधिक प्रमाणात सुरू करावयास हवे की ज्यामध्ये काही वर्ष भारतातच डिजिटल माध्यमातून परदेशातील अभ्यासक्रम करता येईल व केवळ शेवटचे संपूर्ण सेमिस्टर विद्यार्थी परदेशात जातील व भारतात परत येऊन स्टार्टप सूरु करतील. असं झाल्यास उच्च शिक्षित मनुष्यबळास भारतात परत आकर्षित करण्यात येईल. ब्रेनड्रेन थांबेल. 5. हुशार मुलांना भारतातच सामावून घेण्यासाठी आपल्याला शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणावी लागेल. केवळ फेसबुक, इन्स्टाग्राम, व व्हॉट्सप वापरता आलं म्हणजे डिजिटल होता आलं असंनाही. शिक्षण क्षेत्रात अध्ययन, अध्यापन, अभिनव अभ्यासक्रम निर्मिती, कार्यानुभवाधारीत शिक्षण, केवळ प्रमाणपत्र वा गुणपत्रिका न देता ज्ञान व कौशल्य वृद्धिंगत करणारे शिक्षण निर्माण करावे लागेल. चित्रपटाचे ट्रेलर पाहून जसा आपण चित्रपट पाहतो तसेच एखाद्या अभ्यासक्रमाचे ब्रँडिंग हे त्यातून अवगत होणाऱ्या कौशल्यावर आधारित असावे लागेल. हार्वर्ड च्या व ऑक्सफर्डच्या धर्तीवर आपल्यालाही चांगले कोर्स निर्माण करावे लागतील. अध्यापनाचा आशय व तो आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याची पद्धत अमुलाग्र बदलेल. 6 प्रादेशिक भाषांमध्ये आशय निर्मितीची प्रचंड गरज जाणवेल. उदाहरणार्थ भारतीय भाषा शिकवण्यासाठी युट्युबवर असंख्य चॅनेल आहेत. अनेक गोष्टी प्रादेशिक भाषेत उपलब्ध करून देण्याची गरज डिजिटल क्रांतीने निर्माण केली आहे. मराठी, हिंदी तसेच अन्य प्रादेशिक या भाषांमध्ये डिजिटल व्यवहारकरणाऱ्यांची संख्या लक्षणीयअसून त्यांच्यासाठी प्रादेशिक भाषेत आशयनिर्मिती करावी लागेल. 7. शिक्षणातील डिजिटल क्रांतीसाठीशिक्षकव प्राध्यापकांना प्रशिक्षित करावे लागेल.जे स्वतःला अद्ययावत ठेवतील, शिक्षणातील नवे प्रवाह समजून घेतील तेच स्पर्धेत टिकतील. हे विधान दर वेळी केले जाते मात्र करोनोत्तर काळात प्रकर्षाने जाणवेल. कृत्रिम बुद्धिमत्ता(Artificial Intelligence) व मशीन लर्निंग हे सध्या परवलीचे शब्द आहेत. याचा अध्यापनात वापर करावा लागेल. 8. शिक्षक व प्राध्यापक यांची निवड करताना पात्रतेचे निकष बदलतील. संबंधित विषयाचे ज्ञान व अध्यापन कौशल्य यासोबत ती व्यक्ती आधुनिक तंत्रज्ञानाशी (टेक्नॉसॅव्ही) असावी असा निकष ठरेल. म्हणजे वर्गावर जाऊन शिकवण्यापेक्षा डिजिटल टूल्स वापरून लेक्चर घेण्यासोबत त्याला आशय निर्मिती कल्पकतेने करता यायला हवी. डॉ प्रशांत पुरुषोत्तम धर्माधिकारी, सहाय्यक प्राध्यापक, वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभाग, जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे युवल नोवा हरारी या प्रख्यात लेखकाच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या Twenty Lessons for 21st Century या पुस्तकात तो म्हणतो "to stay relevant, you will need the ability to ‘constantly learn and to reinvent yourself" करोनोत्तर काळात शिक्षण क्षेत्राला अमुलाग्र बदल घडवून कात टाकण्याची गरज प्रकर्षानेजाणवू लागली आहे. भारत या क्षेत्रातजे बदल घडवून आणेल ते बदल पुढचे सहस्रक घडवतील

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

परममित्र प्रकाशनाच्या श्री माधव जोशी यांचं दु:खद निधन

परममित्र प्रकाशनाचे PARAM MITRA Publications  श्री माधव जोशी यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे.  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ...