सारे विसरोत याचे वाईट ना वाटे मला./ वाटते वाईट त्यांना विसरता येईना मला./ वाचला वेदांत अन क्षणमात्र त्यांना विसरलो./ दोस्तहो दुस-या क्षणी वेदांत सारा विसरलो./
मंगलवार, 28 अप्रैल 2020
२३ एप्रिल: शेक्सपिअर च्या ४०४ व्या जन्मदिनानिमित्त
२३ एप्रिल: शेक्सपिअर च्या ४०४ व्या जन्मदिनानिमित्त
२३ एप्रिल जसा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा होतो तसाच प्रख्यात इंग्रजी नाटककार विल्यम शेक्सपिअर चा जन्मदिन म्हणून देखील जगभर साजरा केला जातो. २३ एप्रिल १६१६ ते २३ एप्रिल २०२० हा ४०४ वर्षाचा काळ विल्यम शेक्सपियर जगभरातील साहित्यिकांचा एक अभ्यासाचा विषय म्हणून चर्चिला जातो.त्याच्या नाटकांची मोहिनी आजही भारतीय मनावर आहे. बॉलीवूड च्या ‘मकबूल, ओंकारा, हैदर, रामलीला इत्यादी चित्रपटांची कथावस्तू शेक्सपियरच्या नाटकावर आधारित असून मराठीतील प्रसिद्ध “ नटसम्राट” हा चित्रपट शेक्सपिअर च्या किंग लियर या नाटकावर आधारित आहे. त्याच्या सर्व नाटकांची जवळजवळ सर्व भारतीय भाषांत भाषांतर झालेली आहेत. विशेषकरून मराठी रंगभूमीवर त्याच्या नाटकांचे अनेक प्रयोग सादर झाले. थोडक्यात शेक्सपियर हा भारतीय जनमानसात बेमालूम मिसळला आहे.
ज्येष्ठ इंग्रजी कवी एझ्रा पाउंड यांनी साहित्याची व्याख्या करताना असं म्हटलं कि “Literature is a news which stays news”अर्थात साहित्य म्हणजे नेहमी ताजं राहणारं. अनेक दिवस लोटले तरी साहित्य अजरामर राहत. प्रख्यात इंग्रजी कवी जोन कीट्स म्हणतो
A thing of beauty is a joy for ever:
Its loveliness increases; it will never pass into nothingness;
अर्थात जे नित्य नूतन भासते व कधीही जुने होत नाही त्याला सौन्दर्य असे म्हणतात. असाच विचार ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मध्ये “ जे नित्य नूतन जाणिजे/ गीतातत्व // असं म्हटले आहे. कितीदा हि वाचले तरी परत पुन्हा वाचावे वाटणे ही चांगल्या साहित्याची खरी ओळख. शेक्सपिअर च्या साहित्याचे असेच आहे.
ब्रिटीश कौन्सिलच्या सर्वेक्षणामध्ये आढळून आले की भारतात शेक्सपियर इंग्लंडच्या तुलनेत जास्त अभ्यासला जातो. त्याची कारणे अनेक दिली जातात. भारतीय विद्यापीठाच्या कुठल्यातरी वर्षात शेक्सपियर शिकणे अनिवार्य असल्यामुळे कदाचित, किंवा इग्रजांच्या वसाहतीकरण (Colonization) च्या मानसिकतेचे छुपे समर्थन शेक्सपियर करतो म्हणून असेल, मात्र त्याच्या लेखनाची बलस्थाने या निमित्ताने अभ्यासली पाहिजेत.
मागच्या वर्षी शेक्सपियरच्या जन्मगावी : Stratford Upon Avon येथे त्याच्या जन्मघरी ज्येष्ठ अभ्यासक डॉ विजय बेडेकर यांच्या सोबत जाण्याचा योग विद्या प्रसारक मंडळाच्या इंग्लंड अभ्यासदौऱ्याच्या निमित्ताने आला होता. या जन्मगावी शेक्सपिअरचे यथोचित स्मारक करण्यात आले आहे. आजही त्याचे पैतृक घर "शेक्सपियर बर्थप्लेस ट्रस्ट " नावाने मोठ्या दिमाखात उभे आहे. तो येथील हेन्ले रस्त्यावरील एका घरात जन्मला. १८४७ साली हे घर शेक्सपिअर-विश्वस्तांच्या स्वाधीन करण्यात आले. न्यू प्लेस या शेक्सपिअरच्या घराचा मात्र फक्त चौथरा शिल्लक आहे. शेजारच्या वस्तुसंग्रहालयात शेक्सपिअरशी संबंधित वस्तू ठेवल्या आहेत. स्ट्रॅटफर्डच्या चर्चमध्ये त्याचे थडगे व अर्धाकृती पुतळा आहे. ॲव्हन नदीच्या काठावर एक नाट्यगृह, ग्रंथालय व वस्तुसंग्रहालय आहे. ग्रंथालयात शेक्सपिअरवरील दहा हजारांवर दुर्मिळ पुस्तके व हस्तलिखिते आहेत.जगभरातून साधारणत: ६ लाख पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. आजही तेथे त्याच्या अनेक नाटकांचे प्रयोग नियमित होतात. शेक्सपिअर च्या जन्मस्थळाला मी भेट दिल्यावर तयार केलेला एक सुंदर व्हिडीओ ची लिंक सोबत देत आहे. जिज्ञासूनी आवर्जून पहावी ( https://www.youtube.com/watch?v=dq8pNyQh7mc&t=81s)
करोना लॉक डाऊन च्या काळात ग्लोब थियेटर ने तेथील सादर होणाऱ्या नाटकांचे थेट प्रक्षेपण युट्युब वरून जगभरातील शेक्सपिअरप्रेमीसाठी विनामूल्य होत आहे. नुकताच त्याचा रोमियो व ज्युलियट या नाटकाचे लंडन येथील प्रसिद्ध ग्लोब थियेटर मधून थेट प्रक्षेपण झाले. जिज्ञासू वाचकांसाठी ती लिंक सोबत देत आहे. (https://www.youtube.com/watch?v=eSAlPJ0FG_0)
शेक्सपिअरच्या नाटकांची एकत्र संपादित आवृत्ती (फर्स्ट फोलिओ) जॉन हेमिंग व हेन्री काँडेल यांनी १६२३ मध्ये प्रसिद्ध केली. त्यांतील छत्तीसपैकी अठरा नाटके प्रथमच छापली गेली. इतर अठरा अगोदर वेगवेगळी (क्वार्टो आवृत्त्या) छापून प्रसिद्ध झाली होती व त्यांची कायदेशीर नोंदही झाली होती. फर्स्ट फोलिओत पेरिक्लीझ हे नाटक नाही. काही नाटकांच्या फोलिओ व क्वार्टो आवृत्त्यांतील संहितेत कमालीचा फरक दिसतो. काही क्वार्टो आवृत्त्यांतील संहिता तर भ्रष्ट स्वरूपात आहेत. ही नाटके कुणीतरी नाट्यप्रयोग पाहताना किंवा नंतर स्मरणातून लिहून काढली, असा तर्क आहे. या आवृत्त्या विनापरवाना छापल्या असाव्यात, असेही म्हणतात. असे प्रकार त्या काळी सरसहा चालत.
शेक्सपिअरवर इतक्या विविध दृष्टिकोनांतून लिहिले गेले आहे की, त्यामुळे समीक्षेच्या कक्षाच विस्तारल्या आहेत. प्रत्येक शतकाने आपापल्या अभिरुचीप्रमाणे शेक्सपिअरचा अभ्यास केला आहे. त्याच्यातील कलात्मकतेच्या व प्रतिभेवरील हुकमतीच्या अभावाचे दिग्दर्शन करूनही त्याचा समकालीन बेन जॉन्सन त्याला अभिजात ग्रीक नाटककारांच्या पंक्तीत बसवतो. जॉन मिल्टन व जॉन ड्रायनने (सतरावे शतक) त्याच्या निसर्गदत्त प्रतिभेचा गौरव केला व या प्रतिभेच्या दीप्तीने आपल्या ठायी असलेल्या व्युत्पन्न विद्वत्तेच्या अभावाची जाणीव त्यास होऊन दिली नाही, असे म्हटले. शेक्सपिअरच्या शिक्षणाचा ऊहापोह करणारी पुस्तकेही प्रसिद्ध झाली. अठराव्या शतकात शेक्सपिअर व त्याचे समकालीन यांच्याविषयी माहिती गोळा करण्यात आली. शेक्सपिअरच्या नाटकांतील उणिवा व दोषस्थळांची यादी करण्यात आली. शेक्सपिअरखंडाच्या आपल्या विद्वत्तापूर्ण व विवेचक प्रस्तावनेत डॉ. जॉन्सन शेक्सपिअरबद्दल गौरवोद्गगार काढतो पण त्याच्याविषयी न्यायाधीशाचीच भूमिका घेतो. शेक्सपिअरने योजिलेल्या प्रतिमांच्या आधारे त्याच्या सर्जनशील प्रतिभेचे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न अठराव्या शतकापासून आजतागायत चालू आहे. शेक्सपिअरच्या नाटकांतील व्यक्तिरेखांचा अभ्यास अठराव्या शतकाच्या मध्यापासूनच सुरू झाला. शेक्सपिअरच्या पात्रांच्या व्यक्तिमत्त्वाची घडण अत्यंत एकसंध रीतीने होते. त्याच्या नाटकातले व्यक्तिचित्रण म्हणजे सतत विकसित होत असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे केवळ अल्पसे दर्शन वाटावे इतकी त्या व्यक्तिचित्रात सूचकता असते.
शेक्सपियर वर अनेक अभ्यासकांनी अत्यंत सुंदर समीक्षा केली आहे. हा एका अजून वेगळ्या लेखाचा विषय होईल. मात्र इंग्रजीची पहिली डिक्शनरी तयार करणारा म्हणून प्रसिद्ध असलेला प्रख्यात समीक्षक डॉ सम्युअल जॉन्सन आपल्या “ प्रीफेस टू शेक्सपियर” या महत्वपूर्ण निबंधात म्हणतो कि,
“Shakespeare is above all writers, at least above all modern writers, the poet of nature; the poet that holds up to his readers a faithful mirrour of manners and of life. His characters are not modified by the customs of particular places, unpractised by the rest of the world; by the peculiarities of studies or professions, which can operate but upon small numbers; or by the accidents of transient fashions or temporary opinions: they are the genuine progeny of common humanity, such as the world will always supply, and observation will always find. His persons act and speak by the influence of those general passions and principles by which all minds are agitated, and the whole system of life is continued in motion. In the writings of other poets a character is too often an individual; in those of Shakespeare it is commonly a species.”
वरील डॉ जोन्सन याच्या उद्धरणाचा साकल्याने आभ्यास केला असतो असे दिसते कि, शेक्सपिअर ला मानवी मनाची उकल झाली होती. त्याची पात्र जरी इंग्लिश मध्ये बोलणारी व पाश्च्यात्य धाटणीची असली तरी मानवी भावना अस्सल होत्या. शेक्सपिअर ने तत्कालिनी उपलब्ध असलेले नाट्य अभिनयाचे कुठलेही विद्यापीठीय शिक्षण न घेता तत्कालीन ब्रिटीश रसिक मनांवर अधिराज्य गाजवले ते अतुलनीय आहे. शेक्सपिअर च्या समकालीन नाटककारांत प्रसिद्ध असलेले क्रिस्तोफर मारलो इत्यादी ‘युनिव्हर्सिटी विटस” नी शेक्सपिअर ची टीका केली आहे. त्यांचे म्हणणे असे होते कि, शेक्सपिअर ने नाटकाचे कुठलेही अधिकृत शिक्षण न घेता त्याची नाटकं इतकी प्रसिध्द का होतात. रोबर्ट ग्रीन या शेक्सपिअर च्या समकालीन लेखकाने तर त्यावर "an upstart Crow, beautified with our feathers", अशी टीका केली.
इंग्लंडमध्ये नाट्यगृहे १५९२ ते १५९४ पर्यंत प्लेगमुळे बंद होती. या काळात शेक्सपिअरने व्हीनस अँड अडोनिस व द रेप ऑफ ल्यूक्रीझ ही नितांत सुंदर काव्ये लिहिली. तो इटली, डेन्मार्क व जर्मनीलाही जाऊन आला असा तर्क आहे. १५९४ मध्ये नाट्यगृहे परत सुरू झाली. या वर्षापासून शेक्सपिअरचे नाव सतत अग्रभागी दिसते. तो लॉर्ड चेंबरलिन्स मेन या नाटकमंडळीत होता. ह्याच मंडळीचे पुढे ‘किंग्ज मेन’ असे नाव पडले. या मंडळीसाठी शेक्सपिअरने १५९४ ते १६०३ या काळात दरवर्षाला दोन याप्रमाणे नाटके लिहिली. या नाटकांचे प्रयोग लंडनमधील निरनिराळ्या नाट्यगृहांत झाले.
मराठी विश्वकोशाच्या नोंदीनुसार विल्यम शेक्सपिअरच्या नाटकांचे चार प्रकार आहेत : ऐतिहासिक, सुखात्मिका, शोकात्मिका व सुखदुःखांचे मिश्रण असणारे रोमान्सेस. सुरुवातीस शेक्सपिअरने हे बहुतेक प्रकार कसे काय जमतात, हेच जणू पाहिल्यासारखे वाटते. हेन्री द सिक्स्थ- ३ भाग (१५९०–९२) हे ऐतिहासिक नाटक. टायटस अँड्रॉनिकस (१५९३) हा खून व भीषण रक्तपाताने रंजित असा त्यावेळचा लोकप्रिय नाट्यप्रकार. द कॉमेडी ऑफ एरर्स (१५९०) हे प्लॉटस ह्या विख्यात रोमन सुखात्मिकाकाराच्या मेनीकमी ह्या सुखात्मिकेचे इंग्रजी रूपांतर. रिचर्ड द थर्ड (१५९२-९३) ही दारुण शोकात्मिका. द टेमिंग ऑफ द श्रू (१५९४) हा अदभुतरम्य फार्स किंवा प्रहसन. या सर्व नाट्यप्रकारांच्या हाताळणीत शेक्सपिअरचे खास वेगळेपण व कौशल्य जाणवते व त्याने रॉबर्ट ग्रीन ह्या ज्येष्ठ नाटककाराचा मत्सर का जागृत केला हेही समजते. आपल्या सर्व नाटकांची सामग्री शेक्सपिअरने लोकांना अगोदरच माहीत असलेल्या साहित्यातून निवडली आणि या परिचित कथावस्तूंना आपल्या दिव्य प्रतिभेने अभिनव सर्जनशील रूप प्राप्त करून दिले.
ऐतिहासिक नाटकांत शेक्सपिअरने इंग्लंडचा इतिहास उभा करून लँकेस्टर व यॉर्क घराण्यांची भांडणे व त्यांच्यातील यादवी युद्ध यांचे दुष्परिणाम सूचित केले. तसेच राष्ट्रीय ऐक्याचे महत्त्व व आदर्श राजाची प्रतिमा ह्यांचे कलात्मक दर्शन घडविले. त्याच्या ऐतिहासिक नाटकांत इंग्लंडचे बहुतेक ट्यूडर राजे आलेले आहेत. उदा., चौथा, पाचवा, सहावा हेन्री दुसरा, तिसरा रिचर्ड जॉन राजा, तिसरा रिचर्ड, पाचवा हेन्री ही त्यांची काही अमर व्यक्तिचित्रे. त्यांतून शेक्सपिअरचे मानवी मनाचे सखोल व सूक्ष्म ज्ञान व निरीक्षण प्रत्ययास येते. पश्चिमी प्रबोधनकाळात जाज्ज्वल्य राष्ट्रप्रेमाची भावना नव्यानेच सर्व युरोपीय देशांत निर्माण झाली. शेक्सपिअरने इंग्लंडच्या राष्ट्रप्रेमाचा आपल्या नाटकांतून परिपोष केला.
द टू जंटलमेन ऑफ व्हेरोना (१५९४), लव्ह्ज लेबर्स लॉस्ट (१५९४), मिडसमर नाइट्स ड्रीम (१५९६), द मर्चंट ऑफ व्हेनिस (१५९६), मच अडू अबाउट नथिंग (१५९८), ॲज यू लाइक इट (१५९९), ट्वेल्फ्थ नाइट (१५९९) या सुखात्मिकांतून शेक्सपिअरच्या असामान्य प्रतिभेने नाट्यकलेचे सर्व पैलू उजळून काढले. त्यांत मानवी जीवनाचे चौफेर, सूक्ष्म व सावध निरीक्षण आहे. खोचक, बोचक तसेच खळाळून हसविणाऱ्या अव्वल दर्जाच्या विनोदाची कारंजी त्यांत आहेत. असंख्य संस्मरणीय व्यक्तिरेखा आहेत. उदा., शायलॉक, माल्व्होलिओ इत्यादी. रमणीय, बुद्धिमान व जीवनाकडे टवटवीत मनाने पाहणाऱ्या नायिकांचे या सुखात्मिकांत वर्चस्व दिसते. त्यात स्वर्गीय प्रेमभावनेची तरफदारी व कृत्रिम भावनाविवशतेची गोड थट्टाही आहे. डॉगबेरी, व्हर्जेस, विदूषक अशी अनेक विनोदी पात्रे अतिसहजपणे कथावस्तूचा अविभाज्य भाग म्हणून निर्माण करण्यात आली आहेत.
ह्या सुखात्मिकांची संविधानके अनेक गोष्टी, कथा, हकीकती वगैरेंच्या बेमालूम मिश्रणातून तयार झाली आहेत. त्यांतील रचनाकौशल्याने मन स्तिमित होते. घटनांचा क्रम व संगती प्रत्यक्ष जीवनात असावी, इतक्या सहजपणे साधण्यात आली आहे आणि नाटकांच्या संदर्भातही त्यांना तितकीच सहज अपरिहार्यता प्राप्त करून दिली आहे. अव्वल दर्जाचे काव्य, समृद्ध भाषा, नवे शब्द व वाक्प्रचार, गेय गीते यांची या सुखात्मिकांत लयलूट आहे. जीवनाचा भाष्यकार शेक्सपिअर या सुखात्मिकांच्या कालखंडात जीवनाकडे प्रसन्न, आशावादी व ध्येयदृष्टीने पाहत आहे, हे जाणवते.
रिचर्ड द थर्ड व रोमिओ अँड ज्यूलिएट (१५९७) ह्या नाटकांपासून शेक्सपिअरने शोकात्म नाटके लिहिण्यास सुरुवात केली. इ. स. १५९९ ते १६०६ या काळात त्याने जगप्रसिद्ध शोकात्मिका लिहिल्या. उदा., ज्यूलिअस सीझर (१५९९), हॅम्लेट (१६००), ऑथेल्लो (१६०३), किंग लीअर (१६०५), मॅकबेथ (१६०६), अँटनी अँड क्लीओपात्रा (१६०७), टायमन ऑफ अथेन्स (१६०५–०८). यांचा अभ्यास गेली तीनशे वर्षे सतत चालू आहे. यांतील प्रत्येक शोकात्मिका वेगवेगळ्या कारणांसाठी श्रेष्ठ आहे. प्रत्येकीने मानवी जीवनातील गूढ गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व शोकात्मिका एकाच कालखंडात व सुखात्मिकांचा नजराणा प्रेक्षकांना दिल्यानंतर लिहिल्या गेल्या, ही गोष्ट अभ्यासकांना फार अर्थपूर्ण वाटते. या शोकात्मिकांतून खुद्द शेक्सपिअरच्या भावनिक व मानसिक संघर्षाचे प्रतिबिंब पाहण्याचा प्रयत्न नित्य चालू आहे.
मानवी जीवनातील दुःखे नेमकी कशामुळे निर्माण होतात ? ग्रीक दृष्टिकोनाप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या वाट्याला दुःखच येणे, ही त्या व्यक्तीची नियती असते. तसेच केवळ योगायोगाने जीवनात दारुण घटना घडतात, हेही दिसून येते. पण व्यक्ती हीच आपल्या विशिष्ट स्वभावामुळे स्वतःच्या दुःखांना कितपत जबाबदार धरता येईल, असा गहन प्रश्न शेक्सपिअरने उपस्थित केला. स्वभावातील एखादी उणीव हीच व्यक्तीच्या दारुण शोकात्म जीवनास कारणीभूत होते, हे हॅम्लेट, लीअर, ऑथेल्लो इत्यादींच्या चित्रणातून शेक्सपिअरने दाखवून दिले. फारसा अभिनिवेश न बाळगता व्यक्तीच्या दुःखमय जीवनास थोडी नियती, थोडा योगायोग, थोडाफार त्या व्यक्तीचा विशिष्ट स्वभाव इ. कारणीभूत होतात, असे तो सुचवितो. या व्यक्तीच्या जीवनातील प्रत्यक्ष संघर्षापेक्षाही व्यापक स्वरूपाचा तिचा अंतःसंघर्ष चालू असतो वा तो शिव व अशिव यांतील संघर्ष असतो. या संघर्षांतून शेवटी चांगलेच निर्माण होते परंतु ते चांगल्या गोष्टींच्या विनाशाची जबर किंमत देऊनच, असेही शेक्सपिअरने सूचित केले आहे. पण एकंदरीने जीवन हे एक अनाकलनीय गूढ आहे, हेच जाणवत राहते. अँड्रू सिसिल ब्रॅडलीने या दृष्टिकोनातून शेक्सपिअरच्या शोकात्मिकांचा तपशीलवार अभ्यास केला.
प्रमाद, दुःख आणि पाप यांचे कडू जहर या शोकात्मिकांना झाकोळून टाकते. त्यांतील दैवाचा खेळ क्रूर आहे. उदा., ऑफेलिया, डेस्डेमोना, कॉर्डेलिया यांसारख्या निष्पाप नायिकांचा बळी. मानवी जीवन म्हणजे केवळ क्रौर्य व राक्षसीपणा त्यात सद्-गुणांचा विजय व दुर्गुणांचा पराजय वगैरे काही नाही, असे या शोकात्मिकांतून सुचविले आहे. या भीषण जीवनदर्शनाची छाया या काळातल्या ट्रॉइलस अँड क्रेसिडा (१६०२), ऑल्स वेल डेटा एंड्स वेल (१६०२), मेझर फॉर मेझर (१६०४) या सुखशोकमिश्रित नाटकांवरही (रोमान्सेस) पडली आहे. जगविख्यात व्यक्तिचित्रे (हॅम्लेट, इआगो, लीअर) सखोल तत्त्वज्ञान (हॅम्लेटची स्वगते, लीअर व त्याच्या विदूषकाची जीवनावरील भाष्ये) दर्जेदार काव्य मानवी जीवनातल्या सर्व रहस्यांचे अमोघ भाषेत अनावरण परिचित कथासामग्रीवरील दिव्य प्रतिभेचे संस्करण ही शेक्सपिअरच्या शोकात्मिकेची वैशिष्ट्ये होत.
शेक्सपिअरच्या शेवटच्या कालखंडातील नाटके म्हणजे पेरिक्लीझ (१६०८), सिंबेलाइन (१६०९), द विंटर्स टेल (१६१०) व टेंपेस्ट (१६११). या काळात शेक्सपिअर स्ट्रॅटफर्डला स्थायिक झाला होता. त्याला भरपूर लोकप्रियता, कौटुंबिक स्वास्थ्य व ऐश्वर्य मिळाले होते. त्याचा प्रभाव या नाटकांवर पडला आहे असे मत मांडले गेले आहे. ह्या नाटकांची रचना काहीशी सैल आहे. त्यांत जादू, चमत्कार, असंभाव्य घटना, सुख-दुःखांचे मिश्रण, संगीतिकेतील दृश्यकाव्य व संगीत यांचे एक विलक्षण रसायन झालेले दिसते. शेक्सपिअरच्या वृत्तीतील स्थिरता त्यांतून प्रत्ययाला येते. झाले गेले विसरून उदार अंतःकरणाने क्षमाशील बनणे, हाच जीवनातील सर्वश्रेष्ठ गुणविशेष आहे, हेही त्यांतून सूचित झाले आहे.
मात्र तरीही शेक्सपिअरला जी प्रसिद्धी व मान मरातब मिळाला तो त्याचा समकालीन कोणाही नाटककाराला मिळाला नाही हे तितकेच खरे. याचे कारण होते ते म्हणजे शेक्सपिअर ला श्रोत्यांना नेमके काय हवे आहे ते देण्याची कला व जाण. शेक्सपिअर च्या सर्व शोकांतिका मध्ये शेवटी सर्व पात्रे एकमेकांना मारून टाकतात. रंगमंचावर खूप रक्तपात होतो. प्रख्यात ग्रीक तत्वज्ञ ॲरिस्टॉटल याने आपल्या “पोएटीक्स” या ग्रंथात स्पष्ट म्हटले आहे कि, रंगमंचावर रक्तपात दाखवू नये. तरीही शेक्सपिअर रक्तपात दाखवतो याचे कारण तत्कालीन ब्रिटीश मानसिकते होते. तत्कालीन म्हणजे १६ व्या शतकातील इंग्रजी समाज हा अशिक्षित होता, व रक्तपिपासू वृत्तीचा होता. रंगमंचावर रक्त सांडलेले पाहून त्यांना बदल्याची भावना जागृत होता असे, व दुष्टाला शिक्षा झाली या अविर्भावात त्यांना हलके वाटत होते. शेक्सपिअर ने या तत्कालीन प्रेक्षकांच्या मनाचा विचार करून आपल्या शोकान्तिक लिहिल्या.
म्हणजे शेक्सपिअर ज्या १६ व्या शतकात क्रूर व अनागर ब्रिटिश प्रेक्षकांसाठी लिहित होता, त्या काळात “विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले” असा उद्घोष संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी करत ज्ञानेश्वरी नावाचा अजोड ग्रंथ लिहून ४०० वर्षे झाली होती. संत एकनाथांचे अवतार कार्य व ग्रंथलेखन कार्य पार पडले होते. संत तुकाराम हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत सांस्कृतिक योगदान देत होते. याच काळात इंग्लंडमध्ये शेक्सपिअर नाटकं लिहित होता. मराठीचे ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांनी शेक्सपिअर व तुकाराम महाराज यांच्या सामाकालीनत्वाचा उल्लेख करत एक सुंदर कविता लिहिली. ती आजही तेवढीच रसरशीत वाटते.
तुकोबांच्या भेटी । शेक्सपिअर आला ।।
तो झाला सोहळा। दुकानात.
जाहली दोघांची । उराउरी भेट
उरातलें थेट । उरामध्ये
तुका म्हणे "विल्या। तुझे कर्म थोर;
अवघाचि संसार । उभा केला।।"
शेक्सपीअर म्हणे । एक ते राहिले; ।
तुका जे पाहिले विटेवरी."
तुका म्हणे, "बाबा ते त्वां बरे केले,
त्याने तडे गेले। संसाराला;
विठठ्ल अट्टल, । त्याची रीत न्यारी
माझी पाटी कोरी । लिहोनिया."
शेक्सपीअर म्हणे । तुझ्या शब्दामुळे
मातीत खेळले । शब्दातीत
तुका म्हणे गड्या । वृथा शब्दपीट
प्रत्येकाची वाट । वेगळाली
वेगळिये वाटे । वेगळिये काटे;
काट्यासंगे भेटे । पुन्हा तोच.
ऐक ऐक वाजे । घंटा ही मंदिरी।
कजागीण घरी । वाट पाहे."
दोघे निघोनिया गेले दोन दिशां
कवतिक आकाशा आवरेना ।
या कवितेत शेक्सपिअर तुकारामांना भेटायला त्यांच्या दुकानात देहूत येतो. त्यांची उराउरी भेट होते व जीवनाबद्दल चर्चा होते. तुकाराम महाराज शेक्सपिअर च्या नाटकांची व त्यातून त्याने उभ्या केलेल्या संसाराचे कौतुक करतात. मात्र शेक्सपिअर तुकोबांना म्हणतो की, तुम्ही हे विटेवर "सावळं परब्रह्म'' पांडुरंगाच्या रूपाने पहिले ते मला जमले नाही. अर्थात दोन जागतिक दर्जाच्या कवींची भेट होऊन त्यांनी आपलं हृदगत एकमेकांना सांगितलं. आपण मूकपणे त्यांच्या प्रतिभेला विंदांच्या दृष्टीने
"वेगळिये वाटे । वेगळिये काटे;
काट्यासंगे भेटे । पुन्हा तोच"
असं म्हणत सलाम करावयाचा.
डॉ प्रशांत पुरुषोत्तम धर्माधिकारी
सहाय्यक प्राध्यापक
जोशी बेडेकर महाविद्यालय
ठाणे
23.04.2020
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
परममित्र प्रकाशनाच्या श्री माधव जोशी यांचं दु:खद निधन
परममित्र प्रकाशनाचे PARAM MITRA Publications श्री माधव जोशी यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ...
-
तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी "लोकमान्य टिळक केसरीतील निवडक लेखसंग्रह" या साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या प्रस...
-
भाषा ही जीवनमूल्यांचे संचित देते : पद्मश्री डॉ गणेश देवी ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयातर्फे कै डॉ वा ना बेडेकर...
-
निर्माणों के पावन युगमे हम चरित्र निर्माण न भूले स्वार्थ साधना की आंधीमे वसुधा का कल्याण न ना भूले माना अगम अगाध सिन्धु है संघर्षो का प...
Your article gave the insights into the life of Shakespeare as an artist & as a human being. Thank you for sharing.
जवाब देंहटाएंइस टिप्पणी को लेखक द्वारा हटा दिया गया है.
जवाब देंहटाएंInformative and Well drafted Prashant
जवाब देंहटाएंमस्त सर
जवाब देंहटाएं