बुधवार, 3 जून 2020

ऑक्सफर्ड केम्ब्रिज व लंडन अभ्यासदौरा मे 2018

लंडन डायरी
 3जून 2018 

काल लंडनदौरा सम्पवून भारतात परत पोचलो. मागचे पंधरा दिवस म्हणजे स्वप्नवत अनुभव होता. ही तशी माझी दुसरी लंडनवारी. या वेळी डॉ बेडेकरांमुळे जाता आलं. ज्ञानपीपासेनी ओतप्रोत भरलेल्या डॉ बेडेकर या अवलिया माणसाबद्दल काय लिहावं. शैक्षणिक संस्था अभ्यासाच्या व संशोधनाच्या विचारपीठ व्हाव्या म्हणून जगभर फिरणारे डॉ बेडेकर म्हणजे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व. त्यांच्या संपर्कात आल्यावर जगाकडे पाहण्याची एक दृष्टी मिळत जाते . 

जैसे डोळा अंजन भेटे।
 मग दृष्टीशी फाटा फुटे।।

 असं ज्ञानेश्वर माऊली म्हणाले आहेत. विद्यार्थ्यांना काहीतरी नवं देण्याची डॉ बेडेकरांची तळमळ नेहमी जाणवत राहते. काही माणसं आयुष्यात पूर्वसंचित असल्याशिवाय मिळत नाहीत. डॉ विजय बेडेकर हा असा एक अवलिया माणूस. जे जे उन्नत उदात्त व चांगलं त्याचा ध्यास डॉ बेडेकरांनी घेतला आहे. विद्याप्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या इंग्लडच्या अभ्यास दौरा हा एक उदत्ततेच्या शोधयात्रेचा महत्वाचा टप्पा. 

या शैक्षणिक सहली निमित्त अनेक विद्यार्थी व अभ्यासक मित्रांशी संवाद झाला. तीन हजार ब्रिटिशांनी येऊन 33 करोड भारतीयांना जवळपास दीडशे वर्षे लुटलं याचं नेमकं गमक काय हे या दौऱ्यात समजलं. अनुशासन, दस्तऐवजीकरण ,समयसूचकता, व व्यक्तीपेक्षा राष्ट्र महत्वाचं ही धारणा या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेता येतील. पाच मिनिटं संसदेत उशिरा पोचल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा फक्त इंग्लंड मध्ये च होऊ शकतो. या दौऱ्यात शालेय विद्यार्थ्यांच्या सोबत धमाल करण्याचा योग आला . पाच महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक, सोबत होते. कुणाल, संजना, अनिशा ,इनारा व इंद्रनील हे कॉलेजचे विद्यार्थी सोबत होते. संतोष मिर्लेकर मित्राच्या भूमिकेत तर डॉ बेडेकर व डॉ आगरकर यांनी या दौऱ्यात शैक्षणिक आयाम विकसित करण्यासाठी मुलांना प्रेरित केले. 

ऑक्सफर्ड व केम्ब्रिज येथे आम्ही युथ हॉस्टेल मध्ये राहिलो. युवकांनी घरातून व आपल्या देशातून बाहेर पडावं व आजूबाजूचे जग सताड उघड्या डोळ्यांनी पहायला हवं म्हणून जगभर 4000 वसतिगृह चालवणारी YHA युथ हॉस्टेल ही संस्था. या इंग्लंड दौऱ्यात रोजनिशी वाचन हा एक फार छान उपक्रम असतो. प्रत्येकाला रोजची डायरी लिहावी लागते व त्याचे सामूहिक वाचन होते. लंडन मध्ये आम्ही YMCA या भारतीय वसतिगृहात राहतो. हा भाग लंडनच्या हार्ट ऑफ सिटी म्हणावा लागेल . याच वेळी लंडनस्थित काही भरतीय अभ्यासकांना डॉ बेडेकर बोलावतात.  

आपली संस्कृती जपुन ठेवुन इंग्लंड मध्ये काम करणारी डॉ आंबेकर व डॉ सौ आंबेकर सारखी दाम्पत्य दुर्मिळच . त्यांनीही एक दिवस सर्व विद्यार्थ्यांना भेट दिली.

 ज्या भारतीय क्रांतिकारकांनी इंग्लडच्या मातीत राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी काम केलं त्यांच्या स्मृती ताज्या करण्यासाठी आम्ही त्यात्या ठिकाणी भेटी दिल्या त्यात विलक्षण म्हणजे वीर सावरकर लंडनमध्ये ज्या इंडिया हाऊस मध्ये विद्यार्थी असताना राहत होते तिथे आम्ही गेलो, टिळक इंग्रज सरकारने त्यांच्या वर केलेल्या खटल्याला उत्तर द्यायला लंडनमध्ये ज्या वास्तूत राहिले , जिथे मदनलाल धिंग्रा यांनी करझन वाईली ला गोळ्या झाडल्या ती जागा अशा अनेक.... 

लंडन मध्ये ब्रिटिश म्युझियम, ब्रिटिश लायब्ररी हे दोन मानबिंदू पाहिले. चार्ल्स डार्विन या थोर संशोधकाच्या घरी गेलो होतो. मानवाच्या उत्क्रांती चे सिद्धांत मांडणाऱ्या डार्विनचे 22 एकराच्या विस्तीर्ण जागेतले घर ब्रिटिश सरकारने स्मारक म्हणून घोषित केले आहे. शेक्सपिअर चे स्ट्रेटफर्ड अपॉन एव्हन व सेंट पॉल अशा स्थळांना भेटी दिल्या. 

आमचा दौरा 15 ते 25 मे 2018 या काळात झाला . मी मात्र डॉ बेडेकरांसोबत आठ दिवस अधिक राहिलो. या काळात आमचा मुक्काम डॉ मधुकर आंबेकर व डॉ विदुला आंबेकर या दाम्पत्याकडे नॉर्थवूड येथे झाला. आंबेकर प्रभृती हे मागच्या 40 वर्षांपासून लंडन निवासी आहेत. इथल्या भारतीय लोकांशी यांचं जिव्हाळ्याच नातं. त्यांनी माझे व डॉ बेडेकरांनी दोन व्याख्यान आयोजित केली. 

लंडनमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी " Western Scholars of Upanishads" या विषयावर बोलण्याचा योग आला. हा विषय डॉ बेडेकरांनी मला सुचवला होता. व्याख्यानं चांगली झाली. डॉ बेडेकर "Manipulation of Indian Education in 19th Century" या विषयावर बोलले. रामकृष्ण मठाचे लंडन येथील बकिंगहॅमशायर या परिसरातील वेदांत सेंटर पाहण्यासाठी गेलो होतो. स्वामी सर्वस्थानंद यांची भेट व चर्चा झाली. 
या वेळी मास मीडिया विभागाचे चार विद्यार्थी सोबत असल्याने सम्पूर्ण सहल डीएसेलार कॅमेरा व ट्रायपॉड च्या मदतीने रीतसर छायांकित झाली. अनुभवांनी खूप समृद्ध होता आलं ..... 

डॉ प्रशांत धर्माधिकारी 
सहाय्यक प्राध्यापक 
जोशी बेडेकर महाविद्यालय ठाणे 
9422495094











कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

परममित्र प्रकाशनाच्या श्री माधव जोशी यांचं दु:खद निधन

परममित्र प्रकाशनाचे PARAM MITRA Publications  श्री माधव जोशी यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे.  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ...