रविवार, 21 जून 2020

आषाढस्य प्रथम दिवसे: महाकवी कालिदासदिनानिमित्ताने

आषाढस्य प्रथम दिवसे: 
महाकवी कालिदासदिनानिमित्ताने

आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा होतो यावर्षी हा दिवस 22 जून रोजी येत आहे त्यानिमित्ताने कालिदासाच्या एकूणच साहित्यिक अवकाशाचे चिंतन व्हावे असा मानस सर्वांच्या मनात असतो. महाकवी कालिदासाने लिहिलेल्या "मेघदूत" या खंड काव्याच्या दुसऱ्या श्लोकात 
"आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लीष्ट सानुम्
वप्रक्रीडा परिणतगज प्रेक्षणीयं ददर्श ।।" 

असा उल्लेख येतो . कालिदासाच्या जन्मतिथि निमित्ताने विद्वानांमध्ये सहमती नाही. कालिदासाच्या जन्माचा काळ निश्चित नसल्यामुळे त्याने मेघदूतात वर्णन केलेल्या आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिन साजरा केला जातो.  एखाद्या साहित्यिकाच्या कृतीतील उल्लेखावरून त्याचा जन्मदिन साजरा करणे ही कल्पना खूपच छान आहे. 

मेघदूतामध्ये कालिदासाने निसर्गाचे खूपच सुंदर वर्णन केले आहे . मेघदूताचा प्रभाव भारतीय भाषांमधील अनेक कवींच्या साहित्यावर तसेच गटे , मॅक्समुलर इत्यादी विश्व कवींच्या साहित्यावर देखील पहावयास मिळतो. प्रो. मॅक्सम्युलर लिहितात

"Rarely has a man walked our earth who observed the phenomena of living nature as accurately as he, though his accuracy was off course that of a poet and not that of a scientist." 

कालिदासाने संस्कृत साहित्याची दालनं एकाहून एक अशा मौल्यवान रत्नांनी भरवली आहेत

अद्यापि यस्य गायन्ति कीर्ती:  कविवरा अपि।
नमामि कालिदासम् तं  भारतीयं महाकवीम्।।

भारतीय संस्कृतीला अखिल जगतात मूर्धन्य स्थानी प्रस्थापित करण्यात महाकवी कालिदासांचे श्रेष्ठत्व समावलेले आहे.  "कविकुलगुरू" या बिरुदाचा मानकरी असलेला कालिदास म्हणजे भारतीय कवींच्या शिरपेचातला मुकुटमणी म्हणता येईल . आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी पावसाळ्याची सुरुवात होते .महाकवी कालिदासाने आपल्या जगद्विख्यात मेघदूत या काव्याच्या सुरुवातीला पावसाळ्याच्या सुरूवातीचे नितांत सुंदर वर्णन केले आहे

मराठीतील ज्येष्ठ कवी वसंत बापट यांनी आपल्या "जीवीचा जिवलग कालिदास " या लेखामध्ये असं म्हटलं आहे की 'काही कवी प्रेमिकाच्या दृष्टीतून निसर्गाकडे पाहतात. काही त्याच्याकडून शिकवण मिळण्याची अपेक्षा करतात. 'Books in the running Brooks'   अशी स्वतःची मनोभूमिका दर्शवतात. 'Teach me blithe spirit, bird thou never wert'. असे सरळ सरळ आवाहन करतात.  'लवर्स फिलॉसॉफी " Lovers Philosophy" सारख्या कवितेत सृष्टीमध्ये भरून असलेली प्रणयक्रिडा ब्रिटिश कवी शेले  चविष्टपणे सांगतो.  पण कालिदासाची गोष्टच निराळी.  आपल्या जीविताच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आणि वाकणावर त्याला निसर्गाचा नवा नवा प्रत्यय येत राहतो."! 

मेघदूतात महाकवी कालिदासाने एक हृदयस्पर्शी कथा रेखाटली आहे. हेमामाली आणि विशालाक्षी या नूतन विवाहित यक्ष दाम्पत्याची ही कथा आहे.  आपला स्वामी  कुबेराच्या सेवेमध्ये प्रमाद घडल्यामुळे कुबेराने हेममाली ला एक वर्षाच्या विजनवासाची शिक्षा दिली.  नुकतंच लग्न झालेल्या आपल्या प्रिय पत्नी पासून दूर रामगिरी पर्वतावर यक्ष एक वर्षासाठी दूर आला . प्रियाविरहाचा हा काळ रामगिरी पर्वतावर कंठत असताना आठ महिने कसेबसे गेले व पावसाळ्याची सुरुवात झाली. हाच तो आषाढाचा पहिला दिवस . "आषाढ का एक दिन" या नावाचे  हिंदी साहित्यिक मोहन राकेश यांचे नाटक ही प्रसिद्ध आहे .आपल्या प्रिय पत्नीची आकाशात दाटलेल्या मेघाकडे बघून यक्षाला खुप आठवण येते आणि तो त्या मेघा कडे उत्सुक होऊन पाहू लागतो. त्याची अवस्था "उपरि घनं घनरटितं, दूरे दयिता किमेतद आपतितम्। "अशी होते. 

कुटजकुसुमांची उधळण करून अतिशय प्रिय वाक्याने तो मेघाला बोलू लागतो . विरह दुःखाने पीडित व असहाय्य झालेला यक्ष पत्नीच्या आठवणीने उतावीळ होऊन मेघालाच आपला दूत बनवतो आणि हे मेघदूत नावाचे अतुल्य  काव्य कालिदासाच्या सिद्धहस्त लेखणीतून जन्म घेते.

 रामगिरी पर्वतावर अर्थात सध्याचे रामटेक येथे असलेला हा यक्ष मेघाला आपल्या पत्नीकडे संदेश पोचवण्यासाठी जाण्याची विनंती करतो. तसेच त्याच्या अलकावती नगरीचा मार्ग देखील सांगतो. यक्षाची राजधानी असलेल्या अलकापुरी नगरीत त्याचे घर आहे वाटेत जाताना आलेल्या नयनरम्य निसर्ग चित्रणाने दृष्टीचे पारणे फिटते.  विदिशा नगरी व तेथून उज्जैनी नगरीत जाण्याचे मेघाला यक्ष सांगतो. उज्जैन नगरीत महाकाल मंदिराच्या दर्शनानंतर निरविंध्या या नदीचे पाणी पिऊन तू अवंती नगरीत जा तुला वाटेत मयूर रस्ता दाखवतील असेही यक्ष मेघाला सांगतो.
 " हे मेघा तू आल्यामुळे ज्यांचे पती व्यापारासाठी गेले आहेत  अशा स्त्रियांना त्यांच्या आगमनाची चाहूल लागेल. हंसाचासुद्धा प्रणय काळ पावसाळ्यात तुझ्या आगमनामुळे झाल्यामुळे ते तुला त्यांच्या थव्याची माला करून घालतील." असे कालिदास म्हणतो.

मेघाच्या घनश्याम अशा अंगावर मधूनच दिसणारा इंद्रधनुष्य शोभून दिसेल व मेघ मोरपीस धारण करणाऱ्या गोपाळकृष्णासारखा सुंदर दिसेल असे यक्ष मेघास सांगतो. मेघदूतातील मार्ग हा महाराष्ट्रातील नागपूर जवळच्या रामटेक पासून ते उत्तरेकडील अलकावती नगरी पर्यंतचा आहे . या संपूर्ण मार्गाचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की कालिदासाला भारताच्या भूगोलाचा तसेच साधनसंपत्ती , नदी, पर्वत ,निसर्गाचे सौंदर्य याचा खूप व्यासंग होता .या काव्यातून राष्ट्रीय एकात्मतेचा भावही प्रकट होतो.  सध्या झालेले उघडेबोडके पर्वत व पर्यावरणाचा ऱ्हास कालिदासाला अपेक्षित नाही. कालिदासाला वृक्षांनी सजलेले व फळाफुलांनी वेलीनी नटलेली सुजलाम सुफलाम अशी वनसृष्टि अपेक्षित आहे. कालिदासाच्या मेघदूतात उल्लेख झालेल्या फळांचा फुलांचा वेलींचा व निसर्गाच्या चित्रणाचा स्वतंत्र अभ्यास करता येईल

यक्ष राहत असलेल्या अलकापुरी चे वर्णन तर डोळ्यांना थक्क करणारे आहे. 

"जेथे डोळ्याला पाणी हे केवळ आनंदाश्रू मुळे येते, जेथे ताप हा केवळ प्रियेच्या संगमामुळे येतो , जेथे कलह हा केवळ प्रिय सखीच्या प्रणयाशिवाय होत नाही,  आणि जिथे यौवनाशिवाय दुसरे कोणतेही वय नाही" अशा अलका नगरीचे वर्णन कालिदास करतो

 मेघाला यक्षाच्या पत्नीला संदेश द्यावयाचा आहे व अलका नगरीतील यक्षा चे घर मेघ कसा ओळखेल यावर कालिदास यक्षाच्या घराचं खूप सुंदर वर्णन करतात.  
 तत्रागारं धनपतिगृहादूत्तरेणास्मदीयं
 दुरालक्ष्यम् सुरपतिधनुशचारुणा तोरणेन।
 यस्योपांते कृतकतनय: कांतया वर्धितो मे
 हस्तप्राप्यस्तबकनमितो बालमंदारवृक्ष: । 
"कुबेराच्या घराच्या उत्तर दिशेला माझे घर तुला दुरूनच दिसेल. माझ्या घराला तोरण म्हणून इंद्रधनुष्याची योजना केली आहे .माझ्या घरासमोर माझ्या पत्नीच्या हातांनी पाणी पिऊन पुष्ट असा व आपल्या फुलांचा गुच्छामुळे वाकलेला बाल मंदार वृक्ष आहे "

शांता शेळके या ज्येष्ठ मराठी कवयित्री यशाच्या घराच्या वर्णनाच्या लोकांचे सुंदर मराठीत समश्लोकी भाषांतर केले आहे ते असे

" कुबेर सदना जवळी आहे उत्तरेस ते भवन आमुचे
  दुरून भरते नयनी कारण तोरण दारी इंद्रधनुचे 
  प्रियपुत्रासम सखीने माझ्या वाढविलेला तरु अंगणी
   मंदाराचा गुच्छ जयाचे सहज करा मधी येती झुकुनी"

अशा या घरात विरहामुळे व्याकुळ अशी माझी पत्नी आहे असे यक्ष मेघाला सांगतो. कालिदासाने यक्षाच्या पत्नीचे केलेले वर्णन हे विरहातूर अशा नायिकेचे वर्णन आहे.

" विरहामुळे मितभाषी झालेली रडून डोळे सुजलेली व पतीची आठवण करत आणि दिवस मोजत असलेल्या माझ्या पत्नीला पाहून हे मेघा तुला तिची ओळख पटेल. आपल्या पुढ्यात असलेल्या विणेवर माझ्या नावाने युक्त अशा पदांचे गायन करणारी ,अश्रू विणेवर पडल्यामुळे ओल्या झालेल्या तारेला कसेतरी सावरत ती पुन्हा पुन्हा पद  गुणगुणत बसली असेल. 

प्रख्यात मराठी कवयित्री शांता शेळके यांनी मेघदूताचा भावानुवाद केला आहे शांताबाईंच्या अनुवादात  उत्तरमेघातील काही श्लोक मुळातून वाचण्यासारखे आहेत . मराठी भाषेमध्ये कालिदासाच्या संस्कृत श्लोकांची समश्लोकी त्यांनी लिहिलली आहे.  अलका नगरीतील यक्षाचे घर,  घरा भोवतालची सुंदर बाग, यक्ष पत्नी यांचे वर्णन शांताबाई खूप छान करतात. त्यांनी केलेले विरही यक्षपत्नीचे वर्णन असे आहे: 

"मलिनवसनी वा मांडीवरती वीणा घेऊन असेल बसली 
नाव गुंफिले जयात माझे गीत गावया आतुर झाली 
गाताना पण नयनी आसू  ओघळती ते  तारानवरती
 स्वये योजिलेल्या तानांची ही सखीला होते, हाय !विस्मृती!
 उंबरठ्यावर फुले मांडुनी एक एक ती दिवस मोजिते 
 किती विरहाचे मास राहिले पुन्हा पुन्हा अजमावुनी बघते रमते तेव्हा कल्पनेत मम सहवासाची चित्रे रेखून
  विरहा मध्ये रमणी बहुधा असेच करिती मनोविनोदन।"

हे मेघा अशा माझ्या भेटीला आतुर असलेल्या पत्नीला माझा संदेश सांग , की  मी अजून चार महिन्यांनी कार्तिक शुक्ल एकादशीला देवदीपोत्सवादिवशी परत येईन. तोपर्यंत तू माझी वाट पहा. पती खूप दिवस झाले परत येत नाही असे समजून कुठलाही वाईट विचार मनात येऊ देऊ नको. असा संदेश मेघा कडे यक्ष देतो.

मानवी संबंधांचे सत्य व नात्याची घट्ट वीण कालिदास आपल्या वाङ्मयात सुंदरपणे चित्रित करतो.  दोन प्रेमी दूर राहिले तरीही त्यांच्यातील प्रेम हे वाढत जाते हा संदेश कालिदासाला यात द्यायचा आहे.  भारतीय संस्कृतीत धर्म, अर्थ ,काम,  व मोक्ष या चार पुरुषार्थांच्या पूर्तीसाठी गृहस्थाश्रम सांगितला आहे . त्यात दाम्पत्य जीवनात एकमेकांवरील विश्वास ,ज्याला म्यूच्यूअल अंडरस्टँडिंग असे आपण म्हणतो, त्याची वीण घट्ट करण्यासाठी मेघदूताचा सारख्या गीतीकाव्याची रचना झाली

 अंत : पुरातील गुजगोष्टी पासून हिमालयाच्या उत्तुंग शिखरापर्यंत कालिदासाची लेखणी लीलया संचार करते. भोग व त्याग , शृंगार व वैराग्य , काम व मोक्ष यांचा सुरेख समन्वय कालिदास साधतो. डॉ के ना वाटवे यांनी म्हटल्याप्रमाणं वाल्मिकीच्या नीतीला आणि व्यासांच्या बुद्धीला कालिदासाने सौंदर्याची जोड दिली. व्यासांनी सत्य, वाल्मिकीने शिव,  तर कालिदासाने सौंदर्य यांची प्रचिती प्रामुख्याने दिली . व्यास ,वाल्मिकी आणि कालिदास यांच्यात भारतीय संस्कृतीचं सार साठवलेलं आहे असं महर्षी अरविंद म्हणतात ते याचसाठी.

सध्याच्या राजकीय अस्थिरतेच्या व विघटनवादी प्रवृत्तींच्या वाढीच्या या काळात भारताच्या संस्कृतिक एकात्मतेचे एक प्रतीक म्हणून कालिदास महत्वपूर्ण आहे. भारताच्या बहुतांशी भागांची वर्णन त्याच्या साहित्यात आढळतात. भारतीय संस्कृतीचे म्हणून जे आदर्श आहेत ते कालिदासाने अभिव्यक्त केले आहेत व म्हणूनच केरळ पासून काश्मिर पर्यंत सर्वांनाच कालिदास पूज्य वाटतो. 'आपला' वाटतो.

@डॉ प्रशांत पुरुषोत्तम धर्माधिकारी

साप्ताहिक विवेक ने वरील लेख छापला आहे 


गुरुवार, 11 जून 2020

ठाणे कॉलेजात बळजबरीने विलगीकरन कक्ष

ठाणे कॉलेज परिसरात बळाचा वापर करून व कॉलेज प्रशासनाला विचारात  न घेता विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी कॉलेज अधिग्रहित करण्याची बातमी प्रसारमाध्यमात पाहून खूप वाईट वाटले. सत्तालोलुप अधिकारशाहीची मिजास सर्वथा चुकीची आहे.

विद्या प्रसारक मंडळाचा परिसर हा "ज्ञानद्वीप " नावाने प्रसिद्ध आहे. ठाण्याचे सांस्कृतिक संचित या संस्थेने घडवले आहे. साधारणतः 15 हजार विद्यार्थी इथे शिक्षण घेतात.  त्यांच्या निकालाचे काम सुरू असताना अशी अचानक कार्यवाही प्रशासनाने करावयास नको होती.  डॉ बेडेकरांची व त्यांच्या कुटुंबाची सामाजिक बांधीलकी संपूर्ण ठाण्यातील जनता जाणते. त्यांनी उभं केलेलं हे शैक्षणिक संकुल संस्कार व मूल्यशिक्षणात मानबिंदू आहे. मात्र याचा कुठलाही विचार न करता अधिकारांचा गैरवापर करून तारतम्यविहीन वागणुकीचा निषेध केला गेला पाहिजे. 

भारतात एक काळ असा होता की, दुष्यंत राजसारखे चक्रवर्ती सम्राट कण्व मुनीच्या आश्रमात प्रवेश करताना राजपोशाख काढून मुनिवेशात प्रवेश करत असत. कालिदासाने आपल्या अभिज्ञान शाकुंतल नाटकाच्या पहिल्या अंकात राजाने आपल्या राज्यातील शैक्षणिक संस्थांशी केलेला राजव्यवहार अचूकपणे टिपला आहे. 

दुष्यंत राजा कण्व मुनींच्या आश्रमात प्रवेश करताना आपल्या सारथ्यास म्हणतो 

"तपोवन निवासीनाम् उपरोधो मा भूत। विनीतवेशेन प्रवेष्टव्यानि तपोवनानि नाम। "

अर्थात आपण गुरुकुलात प्रवेश करताना आपला रथ , घोडे व शस्त्र बाहेर ठेवून "विनीत वेषात" अर्थात साधे कपडे घालून प्रवेश करू. आपल्या मुळे तपस्वी विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये. 

पुणे विद्यापीठात इंग्रजी साहित्याचे पदव्युत्तर शिक्षण घेताना ऐकलं होतं की, बॅरिस्टर जयकर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असताना पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान म्हणून कार्यक्रमास येणार होते. येण्यास त्यांना विलंब झाला. कार्यक्रम वेळेत सुरू झाला होता. तेंव्हा ते कुलगुरू जयकरांच्या पायावर डोकं ठेवत नेहरूंनी माफी मागितली. शिक्षण संस्थांचा व त्यातील गुरुजनांचा सन्मान यातून अधोरेखित होतो. 

राहत इंदोरी या प्रसिद्ध उर्दू शायराचा एक प्रसिद्ध शेर आहे

जो आज साहिबे मसनद है , कल नही होंगे। 
किरायेदार है, जाती मकान थोड़ी है।

अर्थात आज जे (साहिबे मसनद)
अधिकार पदावर बसले आहेत त्यांना हे कळत नाही की आपण किरयादार आहोत. आपण इथे दीर्घकाळ राहणार नाहीत. ही काही आपली पर्सनल प्रॉपर्टी नाही

सत्तेने नेहमी ज्ञानदान करणाऱ्या संस्थांना ललामभूत मानलं. मात्र आज काळ एवढा बदलला की एखादी संस्था जणूकाही अवैध धंदे चालू असलेल्या ठिकाणाला पोलिसी खाक्या दाखवून अधिग्रहित करतात त्याप्रमाणे धाकदपटशा दाखवून घेतली जाते. शिक्षण ही धोरण कर्त्यांची व प्रशासनाची प्राथमिकता नाही हेच यातून दिसते. जॉन ऍकटन (1834-1902) या प्रसिद्ध ब्रिटिश इतिहासकाराने म्हटले आहे की, Power tends to corrupts, and absolute power corrupts absolutely". 

इतिहासाच्या पुस्तकात प्लेगची साथ व इंग्रजी सोजिरांची जुलमी वागणूक वाचली होती. तीच मिजास जर आपल्या प्रशासनात बसलेल्या लोकांची असेल तर शिक्षणाचे व शिक्षणसंस्थाचे पावित्र्य टिकणार नाही. 'विद्या ददाति विनयं" असं लहानपणी वाचलं होती. विद्या विनय देते म्हणे, मात्र विद्यासंपन्न, धनसंपन्न व अधिकार संपन्न व्यक्तींनी आपल्याच पुढच्या पिढीची आधुनिक तीर्थक्षेत्रे असलेल्या शिक्षणसंस्थांची काळजी मोठ्या विनयाने घ्यावी ही सामान्य नागरिकांची इच्छा असते. या मूलभूत जीवनमूल्यालाच पायदळी तुडवले जात असेल तर भविष्य खूप चांगले आहे असे म्हणता येणार नाही. 


डॉ प्रशांत धर्माधिकारी
साहाय्यक प्राध्यापक
जोशी बेडेकर महाविद्यालय
ठाणे

https://www.lokmat.com/thane/fear-thane-college-benches-worth-lakhs-getting-damaged-due-rain-a301/ 

ठाणे काँलेजचे लाखोंच्या किमतीचे बेंच पावसात भिजून  खराब होण्याची भीती

स्वातंत्र्यवीर सावरकरांची काव्यप्रतिभा फेसबुक लाईव्ह



लॉकडाऊन विशेष वंटास मुंबई सादर करित आहे, 'थेट फेसबुक' लाईव्ह

विषय : "स्वातंत्र्यवीर सावरकरांची काव्यप्रतिभा"

वक्ते : डॉ. प्रशांत धर्माधिकारी (सहाय्यक प्राध्यापक, वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभाग, जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे)

या काव्य प्रतिभेमध्ये सामिल होण्यासाठी तुम्ही, वंटास मुंबईच्या फेसबुक पेजवरून जोडले जाऊ शकता...

आज सायंकाळी : 6.00 वा

https://www.facebook.com/VantasMumbai/videos/792947414568149/

बुधवार, 10 जून 2020

उगवत्या सुर्याच्या देशातून: जपानच्या अभ्यासदौऱ्यानिमित्ताने


"उगवत्या सुर्याच्या देशातून" हा माझा जपान दौऱ्याचे अनुभवकथन करणारा लेख "दिशा" मासिकाच्या मार्च महिन्याच्या अंकात प्रकाशित झाला आहे. सोबत लिंक व लेख देत आहे.

https://www.vpmthane.org/Disha/disha_index.htm


"उगवत्या सुर्याच्या देशातून

बुधवार, 3 जून 2020

ऑक्सफर्ड केम्ब्रिज व लंडन अभ्यासदौरा मे 2018

लंडन डायरी
 3जून 2018 

काल लंडनदौरा सम्पवून भारतात परत पोचलो. मागचे पंधरा दिवस म्हणजे स्वप्नवत अनुभव होता. ही तशी माझी दुसरी लंडनवारी. या वेळी डॉ बेडेकरांमुळे जाता आलं. ज्ञानपीपासेनी ओतप्रोत भरलेल्या डॉ बेडेकर या अवलिया माणसाबद्दल काय लिहावं. शैक्षणिक संस्था अभ्यासाच्या व संशोधनाच्या विचारपीठ व्हाव्या म्हणून जगभर फिरणारे डॉ बेडेकर म्हणजे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व. त्यांच्या संपर्कात आल्यावर जगाकडे पाहण्याची एक दृष्टी मिळत जाते . 

जैसे डोळा अंजन भेटे।
 मग दृष्टीशी फाटा फुटे।।

 असं ज्ञानेश्वर माऊली म्हणाले आहेत. विद्यार्थ्यांना काहीतरी नवं देण्याची डॉ बेडेकरांची तळमळ नेहमी जाणवत राहते. काही माणसं आयुष्यात पूर्वसंचित असल्याशिवाय मिळत नाहीत. डॉ विजय बेडेकर हा असा एक अवलिया माणूस. जे जे उन्नत उदात्त व चांगलं त्याचा ध्यास डॉ बेडेकरांनी घेतला आहे. विद्याप्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या इंग्लडच्या अभ्यास दौरा हा एक उदत्ततेच्या शोधयात्रेचा महत्वाचा टप्पा. 

या शैक्षणिक सहली निमित्त अनेक विद्यार्थी व अभ्यासक मित्रांशी संवाद झाला. तीन हजार ब्रिटिशांनी येऊन 33 करोड भारतीयांना जवळपास दीडशे वर्षे लुटलं याचं नेमकं गमक काय हे या दौऱ्यात समजलं. अनुशासन, दस्तऐवजीकरण ,समयसूचकता, व व्यक्तीपेक्षा राष्ट्र महत्वाचं ही धारणा या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेता येतील. पाच मिनिटं संसदेत उशिरा पोचल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा फक्त इंग्लंड मध्ये च होऊ शकतो. या दौऱ्यात शालेय विद्यार्थ्यांच्या सोबत धमाल करण्याचा योग आला . पाच महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक, सोबत होते. कुणाल, संजना, अनिशा ,इनारा व इंद्रनील हे कॉलेजचे विद्यार्थी सोबत होते. संतोष मिर्लेकर मित्राच्या भूमिकेत तर डॉ बेडेकर व डॉ आगरकर यांनी या दौऱ्यात शैक्षणिक आयाम विकसित करण्यासाठी मुलांना प्रेरित केले. 

ऑक्सफर्ड व केम्ब्रिज येथे आम्ही युथ हॉस्टेल मध्ये राहिलो. युवकांनी घरातून व आपल्या देशातून बाहेर पडावं व आजूबाजूचे जग सताड उघड्या डोळ्यांनी पहायला हवं म्हणून जगभर 4000 वसतिगृह चालवणारी YHA युथ हॉस्टेल ही संस्था. या इंग्लंड दौऱ्यात रोजनिशी वाचन हा एक फार छान उपक्रम असतो. प्रत्येकाला रोजची डायरी लिहावी लागते व त्याचे सामूहिक वाचन होते. लंडन मध्ये आम्ही YMCA या भारतीय वसतिगृहात राहतो. हा भाग लंडनच्या हार्ट ऑफ सिटी म्हणावा लागेल . याच वेळी लंडनस्थित काही भरतीय अभ्यासकांना डॉ बेडेकर बोलावतात.  

आपली संस्कृती जपुन ठेवुन इंग्लंड मध्ये काम करणारी डॉ आंबेकर व डॉ सौ आंबेकर सारखी दाम्पत्य दुर्मिळच . त्यांनीही एक दिवस सर्व विद्यार्थ्यांना भेट दिली.

 ज्या भारतीय क्रांतिकारकांनी इंग्लडच्या मातीत राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी काम केलं त्यांच्या स्मृती ताज्या करण्यासाठी आम्ही त्यात्या ठिकाणी भेटी दिल्या त्यात विलक्षण म्हणजे वीर सावरकर लंडनमध्ये ज्या इंडिया हाऊस मध्ये विद्यार्थी असताना राहत होते तिथे आम्ही गेलो, टिळक इंग्रज सरकारने त्यांच्या वर केलेल्या खटल्याला उत्तर द्यायला लंडनमध्ये ज्या वास्तूत राहिले , जिथे मदनलाल धिंग्रा यांनी करझन वाईली ला गोळ्या झाडल्या ती जागा अशा अनेक.... 

लंडन मध्ये ब्रिटिश म्युझियम, ब्रिटिश लायब्ररी हे दोन मानबिंदू पाहिले. चार्ल्स डार्विन या थोर संशोधकाच्या घरी गेलो होतो. मानवाच्या उत्क्रांती चे सिद्धांत मांडणाऱ्या डार्विनचे 22 एकराच्या विस्तीर्ण जागेतले घर ब्रिटिश सरकारने स्मारक म्हणून घोषित केले आहे. शेक्सपिअर चे स्ट्रेटफर्ड अपॉन एव्हन व सेंट पॉल अशा स्थळांना भेटी दिल्या. 

आमचा दौरा 15 ते 25 मे 2018 या काळात झाला . मी मात्र डॉ बेडेकरांसोबत आठ दिवस अधिक राहिलो. या काळात आमचा मुक्काम डॉ मधुकर आंबेकर व डॉ विदुला आंबेकर या दाम्पत्याकडे नॉर्थवूड येथे झाला. आंबेकर प्रभृती हे मागच्या 40 वर्षांपासून लंडन निवासी आहेत. इथल्या भारतीय लोकांशी यांचं जिव्हाळ्याच नातं. त्यांनी माझे व डॉ बेडेकरांनी दोन व्याख्यान आयोजित केली. 

लंडनमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी " Western Scholars of Upanishads" या विषयावर बोलण्याचा योग आला. हा विषय डॉ बेडेकरांनी मला सुचवला होता. व्याख्यानं चांगली झाली. डॉ बेडेकर "Manipulation of Indian Education in 19th Century" या विषयावर बोलले. रामकृष्ण मठाचे लंडन येथील बकिंगहॅमशायर या परिसरातील वेदांत सेंटर पाहण्यासाठी गेलो होतो. स्वामी सर्वस्थानंद यांची भेट व चर्चा झाली. 
या वेळी मास मीडिया विभागाचे चार विद्यार्थी सोबत असल्याने सम्पूर्ण सहल डीएसेलार कॅमेरा व ट्रायपॉड च्या मदतीने रीतसर छायांकित झाली. अनुभवांनी खूप समृद्ध होता आलं ..... 

डॉ प्रशांत धर्माधिकारी 
सहाय्यक प्राध्यापक 
जोशी बेडेकर महाविद्यालय ठाणे 
9422495094











सोमवार, 1 जून 2020

स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता

स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता 

28 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १३७ वी जयंती जगभर साजरी झाली . यानिमित्त त्यांच्या काव्याप्रतिभेवर प्रकाश टाकणारा डॉ प्रशांत धर्माधिकारी यांचा लेख 
-------- 

28मे 2019 रोजीचा लंडन येथील फोटो


‘मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन’ अशी वयाच्या पंधराव्या वर्षी प्रतिज्ञा घेणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवन म्हणजे भारतीयांसाठी एक मोठा उर्जेचा स्त्रोत आहे. त्यांची १३७ वी जयंती २८ मे रोजी जगभर साजरी केली जाते. इंग्रजी राजवटीपासून भारताची मुक्तता करण्यासाठी चालवलेल्या क्रांतिकारी चळवळीचे अग्रदूत म्हणून सावरकरांचे योगदान मोठे आहे. चाफेकर बंधूना झालेल्या फाशीच्या शिक्षेचा कोवळ्या वयातील सावरकरांवर मूलगामी परिणाम झाला. सशस्त्र क्रांती, बलोपासना, स्वदेशी, राष्ट्रप्रेम इत्यादी विषयांवर सावरकरांची अगाध श्रद्धा होती. लोकमान्य टिळकांना त्यांनी मनोमन आपले गुरुपद बहाल केले होते. सावरकर हे केवळ स्वातंत्र्यवीर नव्हते तर एक महाकवी, भाषाशास्त्रज्ञ, भाषाशुद्धी चळवळीचे प्रणेते, नाटककार, कथा, लेखक, वक्ते व दार्शनिक होते. सावरकरांची कविता बहुप्रसवा होती. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी ‘श्रीमंत सवाई माधवराव’ यांच्यावर फटका लिहिला व वयाच्या १५ व्या वर्षी ‘स्वदेशीचा फटका’ लिहिला. १९६५ साली प्रकाशित झालेल्या ‘समग्र सावरकर वाङमय’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हटलं आहे कि, ‘सावरकरांचे काव्य हे जीवनात प्रतिभेतून निर्माण झालेले असून त्यांच्या कोणत्याही चार स्फुट कविता घेतल्या तरी महाराष्ट्रातील नामवंत कवीत त्यांची अग्रस्थानी गणना होऊ शकेल. त्यांनी अनेक विषयांवर कविता लिहिल्या असून त्याची प्रत्येक कविता देशप्रेमाने ओथंबलेली , वीररसाने भरलेली, प्रतिभेच्या विपुलतेने चमकणारी आणि तत्वज्ञान व ध्येयवाद यांचा उद्घोष करणारी असून महाकवीच्या कोणत्याही कसोटीवर विचार करताना स्वा सावरकरांना महाकवी हेच विशेषण योग्य ठरते.’ १० नोव्हेंबर १९५० च्या दैनिक काळ च्या दिवाळी अंकात नोंदवले आहे की, महाकवी हे उपपद एखाद्या कवीस दोन अर्थानी लावतात, एक, ज्याची प्रतिभा उज्ज्वल व जो जीवनाचे भव्योदात्त दर्शन घडवितो तो महाकवी किंवा, जो महाकाव्य(EPIC)नावाचा काव्यप्रकार रचतो तो. पहिल्या अर्थी शेक्सपिअर, भवभूती, नि बाण यांना महाकवी म्हणतात. दुसर्या अर्थी महाकाव्य लिहिणारे टासो, माघ, भारवी, श्रीहर्ष इत्यादींना महाकवी म्हणतात. सावरकर या दोन्ही अर्थी महाकवी आहेत ‘कमला’ या महाकाव्याची रचना करताना सावरकरांनी ‘वैनायक’ या विशेष वृत्ताची निर्मिती केली. मराठी भाषेच्या काव्यात्म जाणीवेस वैनायक हा सुंदर नजराणा आहे. सावरकरांची संपूर्ण कविता सुमारे १३,५०० ओळींची भरेल. सावरकरांची कविता या नावाने त्यांची कविता १९४३ साली प्रकाशित करण्यात आली आहे. त्यांनी ‘उ:शाप’, ‘सन्यस्त खड्ग’ व ‘उत्तरक्रिया’ अशी तीन संगीत नाटके लिहिली. आजही सावरकरांनी लिहिलेली ‘ शतजन्म शोधिताना’ , ‘मर्मबंधातली ठेव ही’ इत्यादी नाट्यपदे मोठ्या रसिकपणे गायिली जातात. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. स . ग. मालशे म्हणतात कि, “ मिल्टन सारखी पारंपारिक उपमा, रूपके रचावी सावरकरांनीच. त्यांच्या भावना जेव्हा कोमल, अगदी हळव्या बनतात तेंव्हा त्यांचे शब्दरूप महाकवीच्या प्रासादिक वाणी प्रमाणे आविष्कृत होते. ‘सांत्वन’ मधल्या ओव्या किंवा ‘कि घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने ‘ ह्या सारखे श्लोक व्यास वाल्मिकींच्या, श्रीधर –मुक्तेश्वरांच्या वाणी सारखे दिव्य आणि प्रासादिक वाटतात. सावरकरांनी आर्या, शार्दुलविक्रिडीत, इंद्रवज्रा, वसंततिलका इत्यादी वृत्त चपखलपणे कवितेत वापरले आहेत. त्यांनी लिहिलेली ‘श्री टिळक स्तवन ‘ ही आर्यावृत्ताचा अजोड नमुना आहे. १९०२ साली सावरकर फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थी असताना ‘आर्य संघ’ साठी दर आठवड्याला म्हणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांवर ‘जय देव जय देव जय जय शिवराया’ ही आरती लिहिली. पोवाडा, फटका, आदि काव्यप्रकारांसह सावरकरांनी वीर रसा बरोबरच शृंगार देखील सिद्धहस्तपणे हाताळला आहे. आपला मुलगा प्रभाकर हा लहानपणीच वारला तेंव्हा सावरकर लंडन मुक्कामी होते. तेव्हा त्यांनी ‘प्रभाकरास’ नावाची कविता पुत्र स्नेहाने दु:खगद्गद होऊन लीहिली. ही कविता सावरकरांनी आपल्या ‘ शिखांचा इतिहास’ या ग्रंथाला अर्पणपत्रिका म्हणून लिहिली. १९०६ साली कायद्याची पदवी घेण्यासाठी सावरकर इंग्लंडला रवाना झाले. त्यावेळी बोटीने समुद्र प्रवास करताना प्रियजनांचा विरहाला मुखरित करीत ‘सुनील नभ हे सुंदर नभ हे’ ही कविता लिहिली. १९०९ साली ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर सावरकरांनी ‘सागरा प्राण तळमळला’ हि अजरामर कविता लिहिली. त्यात ते म्हणतात की ‘नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा मज भरतभूमीचा तारा प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी’ ‘सांत्वन’ व ‘माझे मृत्युपत्र’ या दोन उर्जस्वल कविता सावरकरांच्या लेखणीतून लंडन वास्तव्यात मूर्त झाल्या. या दोन्ही कविता त्यांनी आपल्या वहिनींना उद्देशून लिहिल्या असून ह्या कविता म्हणजे सावरकरांच्या काव्यप्रतिभेचा कळस आहे. माझे मृत्युपत्र या कवितेत सावरकर लिहितात की जर आम्ही सात भाऊ असतो तरीही त्या सर्वांनी देशसेवेसाठी प्राणार्पण केले असते. हे मातृभूमी तुजला मन वाहियेले वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले तुतेची अर्पिली नवी कविता रसाला लेखाप्रती विषय तूची अनन्य झाला सावरकरांच्या कवितेचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे ते आपली कविता मातृभूमीच्या मुक्तीसाठी अर्पण करतात. त्यांच्यासाठी मातृभूमीपेक्षा श्रेष्ठ काहीच नव्हतं. त्यांच्या बद्दल असं म्हटलं जात असे की ‘If at all there was any sweetheart in his life, that was his motherland’ सावरकरांची इंग्रजी कवितेची जाण देखील उच्च दर्जाची होती. त्यांनी लिहिलेली ‘The Revolutionist to Himself’ ही कविता त्यांचावरील असलेल्या ज्येष्ठ इंग्रजी कवी जॉन मिल्टन चा प्रभाव दाखवते. इंग्रजी, संस्कृत, मराठी सोबतच त्यांचे उर्दू भाषेवर देखील प्रभुत्व होते. हिंदुत्वाची व्याख्या करणारा व संस्कृत प्रचुर मराठी वापरणारा सावरकरांसारखा एक तत्वज्ञ जेंव्हा उर्दू भाषेचा साज आपल्या काव्याप्रतीभेस चढवतो तेंव्हा त्यांच्या तरल भावाविश्वाचे दर्शन होते. २०१३ साली अभ्यासकांना सावरकरानी लिहिलेल्या काही उर्दू गझल सापडल्या. त्यातील काही शेर असे: यही पाओगे मेहशरमें जबां मेरी, बयाँ मेरा मैं बंदा हिंदवाला हूँ, यही हिंदोस्ताँ मेरा मेरा है रक्त हिंदी, जात हिंदी, ठेठ हिंदी हूँ यही मजहब, यह फिर्का, यही हैं खानदाँ मेरा विशेष म्हणजे १९३८ साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना सावरकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भाषाशुद्धी, लिपिशुद्धी ह्यांचे महत्व सांगितले. साहित्याचे वस्तुनिष्ठ व रसनिष्ठ असे दोन भाग कल्पून त्याचे विवरण करत भाषणाच्या अखेरीस लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या’ असा परखड विचार मांडला. देशसेवेचे वृत्त हे सतीचे वाण म्हणून स्वीकारलेला हा कवी ‘तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण’ असा उद्घोष करतो. आजच्या जगात देखील साहित्यिक व कवींच्या समोर असलेल्या आव्हानांना मोठी दिशा देणारी स्वातंत्र्यवीरांची लेखणी व काव्यसंपदा आपल्याला दीपस्तंभासारखी भारताच्या उर्जस्वल भविष्याची साक्ष देत राहते.



 *** डॉ प्रशांत पुरुषोत्तम धर्माधिकारी


 28 मे रोजी खालील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात महाराष्ट्रातील तरुणाईला संबोधित करता आला याचा अभिमान वाटतो 
:::::::

 *स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त #FacebookLive* @ABVPKonkan 
 विषय:- *"स्वातंत्र्यवीर सावरकर: एक बहु आयामी कवी"

 वक्ता:- *डॉ. प्रशांत धर्माधिकारी*
(सहाय्यक प्राध्यापक, वृत्तपत्र व संज्ञापन विभाग, जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे)

 *२८ मे २०२० | सायं. ६:०० वा*

करोनोत्तर उच्च शिक्षणातील नवे प्रवाह

करोनोत्तर उच्च शिक्षणातील नवे प्रवाह डॉ प्रशांत पुरुषोत्तम धर्माधिकारी करोना लॉक डाऊन च्या काळात शिक्षण हे अत्यावश्यक सेवांमध्ये मोडत नाही हे वास्तव समोर आले. हे खूप दुर्दैवी आहे. " वर्क फ्रॉम होम "ही संकल्पना शिक्षण क्षेत्रात अजून म्हणावी तेवढी रुजली नाही. हे होण्याचे कारण म्हणजे भारतात अध्ययन अध्यापनाचा परंपरागत दृष्टिकोन. शिक्षकांनी निर्धारित विषय व अभ्यासक्रम परीक्षेच्या दृष्टिकोनातून शिकवावा ही अपेक्षा विद्यार्थी व एकूणच व्यवस्थेची असते. त्यामुळे वर्षानुवर्षे तोच तो अभ्यासक्रम, काही सुविद्य अपवाद वगळता , रटाळ पद्धतीने 'संपवला' जातो. असं दिसतं की विद्यार्थ्यांना परीक्षेचा कंटाळा आला आहे. परीक्षा घेण्याच्या पद्धतीचा किंवा एकूणच परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या रटाळ प्रश्नांचा उबग आला असावा असे वाटते. मात्र लॉकडाऊन च्या काळात विद्यार्थी घरीच बसून इतके वेगवेगळे उपक्रम करत आहेत. शिक्षकांना सुद्धा झूम, गुगल मीट, व्हिडीओ कॉल या माध्यमातून लेक्चर घेताना वेगळाच फील येतोय. उच्च शिक्षणातल्या रेट्यामुळे का होईना वेबिनार, एफ डी पी चे सेशन्स प्राध्यापक करत आहेत. करोनोत्तर जगात डिजिटल कौशल्य अद्ययावत असण्याची अपरिहार्यता यामागे आहे. आपण स्पर्धेत मागे पडू ही भीती आहे. लॉक डाऊन च्या काळात विद्यार्थ्यांशी नियमित संवाद साधताना त्यांच्यासोबत झालेल्या चर्चांमधून व माझ्या वयक्तिक परदेशी विद्यापीठांच्या अभ्यासदौऱ्यातील अनुभवांवरून करोनोत्तर उच्चशिक्षण कसे असेल यावर काही मुद्दे खालीलप्रमाणे मांडता येतील. 1.करोनोत्तर अभ्यासक्रम तयार करताना त्याची उद्देशिका (Mission Statement) ही संपूर्ण पणे वेगळी असेल. शिक्षण थेरोटीकल शिकवण्यापेक्षा डिजिटल मॉड्युल्स तयार करून व ई- रिसोर्स देऊन बनवावे लागतील. मी इंग्रजी विषयाचा प्राध्यापक असल्याने भाषेचे उदाहरण देईन. इंग्रजी संभाषण क्षमता आत्मसात करण्यासाठी सद्य प्रचलित अभ्यासक्रमात थेरोटीकल गोंष्टींचा भरणा जास्त आहे मात्र भाषा अवगत करण्यासाठी त्या भाषेतील गोष्टींचे श्रवण Listening skills कडे दुर्लक्ष होते. या उलट रोज 20 मिनिटे इंग्रजीतील टेड स्पिचेस वर्गात मोठ्या आवाजात ऐकवली तर विद्यार्थी एका महिन्याच्या आत इंग्रजी बोलतात. आपण भाषेबद्दल शिकवतो भाषा शिकवत नाही. व्याकरणशिकवण्यापेक्षा त्या भाषेतील उच्चदर्जाचे साहित्य शिकवण्याच्या अनुभवातून भाषा शिकता येते. 2. करोना लोकडाऊन मध्ये सर्व क्षेत्र ठप्प आहेत मात्र डिजिटल व आय टी क्षेत्र हे मोठ्या (ऐटीत) तेजीत होती. आजसुद्धा ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर एडीएक्स, कोर्सेरा इत्यादी संकेतस्थळांनी करोना लॉक डाऊन स्पेशल कोर्सेस अत्यल्प पैशात सुरू केले आहेत. अभियांत्रिकी, विधी, विज्ञान, साहित्य, भाषा आशा अनंत विषयावर कमीत कमी 1 दिवस ते 4 आठवडे या कालावधीत संपणारे अभिनव अभ्यासक्रम एमआयटी व हार्वर्ड या अमेरिकेतील लब्धप्रतिष्ठित विद्यापीठांनी Edx.org या प्लॅटफॉर्म वर सुरू केले आहेत. कुठल्याही अभ्यासक्रमाला कमीत कमी 1हजार ते 30 हजार विद्यार्थी नाव नोंदवतात. त्यातही दोन प्रकार आहेत. तुम्ही तो कोर्स विनामूल्य पूर्ण करू शकता किंवा अगदी50 ते 100 डॉलर मध्ये कोर्सचे त्या विद्यापीठाचे सर्टिफिकेट मिळवू शिकता. उदाहरणार्थ मी edx.org या प्लॅटफॉर्म वर William Shakespeare: Life and Works हा हार्वर्ड विद्यापीठाचा 4 आठवड्याचा कोर्स करत आहे. या कोर्सला नाव नोंदवणारा मी 20,345 वा विद्यार्थी आहे. मला सर्टिफिकेट साठी फक्त 49 डॉलर अर्थात 3780 रुपये भरावे लागले. मात्र मला हार्वर्डचे सर्टिफिकेट मिळणार व तेही भारतात बसून. सोबत वरील विषय शिकवणारा स्टीफन ग्रीनब्लाट हा अमेरिकेतील शेक्सपिअर या विषयावरचा ख्यातकीर्त अभ्यासक आहे . 3. परीक्षा पद्धतीत सकारात्मक बदल करावे लागतील. उदाहरणार्थ edx.org या प्लॅटफॉर्मवर परीक्षा ही अभिनव पद्धतीने घेण्यात येते. ऑनलाइन डॅशबोर्ड तयार करून अभ्यासक्रमाला नाव नोंदवलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन चर्चा एकत्रपणे करता येते. कल्पक प्रकल्प ( असाईनमेंट) देऊन त्याचे मूल्यमापन प्रथम आपले सहाध्यायी करतात (Peer evaluation). या डॅशबोर्डवर शिक्षक वेळप्रसंगी आशयाचे नियमन करतो व ग्रेडिंग करतो. शिक्षकाने दिलेल्या व्हडिओ लेक्चर वर आधारित 300 वा500 शब्दात उत्तर लिहिण्यासाठी असाईनमेंट दिली जाते . कोर्स समाधानकारक रित्या पार पडल्यास प्रमाणपत्र मिळते. सध्या भारतात लॉकडाऊनच्या काळात वेबिनारचे पीक आले आहे. एरव्ही जे वर्गावर जाऊन बोलणार असतो ते आपल्या गॅलरीत बसून बोलणे म्हणजे वेबिनार नाही. अध्यापनाचा आशय डिजिटली बदलत नाही तोपर्यंत ते व्याख्यान रोचक होत नाही 4. करोनोत्तर काळात परदेशात शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा कमी होईल असे वाटते. किंवा असे अभ्यासक्रम अधिक प्रमाणात सुरू करावयास हवे की ज्यामध्ये काही वर्ष भारतातच डिजिटल माध्यमातून परदेशातील अभ्यासक्रम करता येईल व केवळ शेवटचे संपूर्ण सेमिस्टर विद्यार्थी परदेशात जातील व भारतात परत येऊन स्टार्टप सूरु करतील. असं झाल्यास उच्च शिक्षित मनुष्यबळास भारतात परत आकर्षित करण्यात येईल. ब्रेनड्रेन थांबेल. 5. हुशार मुलांना भारतातच सामावून घेण्यासाठी आपल्याला शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणावी लागेल. केवळ फेसबुक, इन्स्टाग्राम, व व्हॉट्सप वापरता आलं म्हणजे डिजिटल होता आलं असंनाही. शिक्षण क्षेत्रात अध्ययन, अध्यापन, अभिनव अभ्यासक्रम निर्मिती, कार्यानुभवाधारीत शिक्षण, केवळ प्रमाणपत्र वा गुणपत्रिका न देता ज्ञान व कौशल्य वृद्धिंगत करणारे शिक्षण निर्माण करावे लागेल. चित्रपटाचे ट्रेलर पाहून जसा आपण चित्रपट पाहतो तसेच एखाद्या अभ्यासक्रमाचे ब्रँडिंग हे त्यातून अवगत होणाऱ्या कौशल्यावर आधारित असावे लागेल. हार्वर्ड च्या व ऑक्सफर्डच्या धर्तीवर आपल्यालाही चांगले कोर्स निर्माण करावे लागतील. अध्यापनाचा आशय व तो आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याची पद्धत अमुलाग्र बदलेल. 6 प्रादेशिक भाषांमध्ये आशय निर्मितीची प्रचंड गरज जाणवेल. उदाहरणार्थ भारतीय भाषा शिकवण्यासाठी युट्युबवर असंख्य चॅनेल आहेत. अनेक गोष्टी प्रादेशिक भाषेत उपलब्ध करून देण्याची गरज डिजिटल क्रांतीने निर्माण केली आहे. मराठी, हिंदी तसेच अन्य प्रादेशिक या भाषांमध्ये डिजिटल व्यवहारकरणाऱ्यांची संख्या लक्षणीयअसून त्यांच्यासाठी प्रादेशिक भाषेत आशयनिर्मिती करावी लागेल. 7. शिक्षणातील डिजिटल क्रांतीसाठीशिक्षकव प्राध्यापकांना प्रशिक्षित करावे लागेल.जे स्वतःला अद्ययावत ठेवतील, शिक्षणातील नवे प्रवाह समजून घेतील तेच स्पर्धेत टिकतील. हे विधान दर वेळी केले जाते मात्र करोनोत्तर काळात प्रकर्षाने जाणवेल. कृत्रिम बुद्धिमत्ता(Artificial Intelligence) व मशीन लर्निंग हे सध्या परवलीचे शब्द आहेत. याचा अध्यापनात वापर करावा लागेल. 8. शिक्षक व प्राध्यापक यांची निवड करताना पात्रतेचे निकष बदलतील. संबंधित विषयाचे ज्ञान व अध्यापन कौशल्य यासोबत ती व्यक्ती आधुनिक तंत्रज्ञानाशी (टेक्नॉसॅव्ही) असावी असा निकष ठरेल. म्हणजे वर्गावर जाऊन शिकवण्यापेक्षा डिजिटल टूल्स वापरून लेक्चर घेण्यासोबत त्याला आशय निर्मिती कल्पकतेने करता यायला हवी. डॉ प्रशांत पुरुषोत्तम धर्माधिकारी, सहाय्यक प्राध्यापक, वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभाग, जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे युवल नोवा हरारी या प्रख्यात लेखकाच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या Twenty Lessons for 21st Century या पुस्तकात तो म्हणतो "to stay relevant, you will need the ability to ‘constantly learn and to reinvent yourself" करोनोत्तर काळात शिक्षण क्षेत्राला अमुलाग्र बदल घडवून कात टाकण्याची गरज प्रकर्षानेजाणवू लागली आहे. भारत या क्षेत्रातजे बदल घडवून आणेल ते बदल पुढचे सहस्रक घडवतील

परममित्र प्रकाशनाच्या श्री माधव जोशी यांचं दु:खद निधन

परममित्र प्रकाशनाचे PARAM MITRA Publications  श्री माधव जोशी यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे.  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ...