मंगलवार, 19 जून 2018


ऑक्सफर्ड केम्ब्रिज व लंडन: आंग्लभूमीचा रोमांचक प्रवासवृत्तांत
---------------------------------------------------------
विद्या प्रसारक मंडळातर्फे दर वर्षी मे महिन्यात ऑक्सफर्ड केम्ब्रिज व लंडनचा अभ्यासदौरा आयोजित करण्यात येतो. यावर्षी दि 15 ते 25 मे रोजी या दौऱ्यात भाग घेतलेल्या प्रशांत धर्माधिकारी यांचे अनुभव चितारणारा हा लेख 
-----------------------------------------------------------

काही माणसं आयुष्यात पूर्वसंचित असल्याशिवाय मिळत नाहीत. डॉ विजय बेडेकर हा असा एक अवलिया माणूस. जे जे उन्नत उदात्त व चांगलं त्याचा ध्यास डॉ बेडेकरांनी घेतला आहे.    विद्याप्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या 15 मे ते 25 मे 2018 दरम्यान झालेला अभ्यास दौरा हा एक उदत्ततेच्या शोधयात्रेचा महत्वाचा टप्पा. शैक्षणिक संस्था अभ्यासाच्या व संशोधनाच्या विचारपीठ व्हाव्या म्हणून जगभर फिरणारे डॉ बेडेकर म्हणजे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व. त्यांच्या संपर्कात आल्यावर जगाकडे पाहण्याची एक दृष्टी मिळत जाते .

जैसे डोळा अंजन भेटे।
मग दृष्टीशी फाटा फुटे।।

असं माऊली म्हणाले आहेत. विद्यार्थ्यांना काहीतरी नवं देण्याची डॉ बेडेकरांची तळमळ नेहमी जाणवत राहते.

या शैक्षणिक सहली निमित्त अनेक विद्यार्थी व अभ्यासक मित्रांशी संवाद झाला. तीन हजार ब्रिटिशांनी येऊन 33 करोड भारतीयांना जवळपास दीडशे वर्षे लुटलं याचं नेमकं गमक काय हे या दौऱ्यात समजलं. अनुशासन, दस्तऐवजीकरण ,समयसूचकता, व व्यक्तीपेक्षा राष्ट्र महत्वाचं ही धारणा या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेता येतील. पाच मिनिटं संसदेत उशिरा पोचल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा फक्त इंग्लंड मध्ये च होऊ शकतो.

या दौऱ्यात शालेय विद्यार्थ्यांच्या सोबत धमाल करण्याचा योग आला . पाच महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक, वेळणेश्वर च्या महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चिंचोलकर व सौ चिंचोलकर हे देखील सोबत होते. कुणाल, संजना, अनिशा ,इनारा व इंद्रनील हे कॉलेजचे विद्यार्थी सोबत होते. ए के जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या 17 विद्यार्थिनी सोबत होत्या.   संतोष मिर्लेकर व्यवस्थापकाच्या भूमिकेत तर डॉ बेडेकर व डॉ आगरकर यांनी या दौऱ्यात शैक्षणिक आयाम विकसित करण्यासाठी मुलांना प्रेरित केले.  डॉ आगरकर हे टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्थेत दीर्घकाळ संशोधक होते व जगभर एक अभ्यासक म्हणून त्यांची भ्रमंती असते. विज्ञानाची परिभाषा सोप्या करून सांगण्यात त्यांचा हातखंडा आहे. या शैक्षणिक सहलीत डॉ आगरकर Friend Philosopher and Guide या भूमिकेत होते. 

फोटो 1

आमचा पहिला मुक्काम केम्ब्रिज च्या युथ हॉस्टेल मध्ये होता. युवकांनी घरातून व आपल्या देशातून बाहेर पडावं व आजूबाजूचे जग सताड उघड्या डोळ्यांनी पहायला हवं म्हणून जगभर 4000 वसतिगृह चालवणारी YHA युथ हॉस्टेल ही संस्था. केम्ब्रिज मध्ये  "हिप ऑन हिप ऑफ" नावाच्या बसेस सम्पूर्ण केम्ब्रिज मध्ये ठराविक वेळात नियमित चालू असतात. या बस मधून आपण कुठल्याही स्थानी उतरू शकतो.  इच्छित कॉलेज वा संग्रहालय पाहून झालं की पुढच्या बसने परत पुढच्या ठिकाणी जाता येतं. या बस मध्ये हेडफोन मिळतात, त्याद्वारे आपण गाडी ज्या ज्या कॉलेज व वास्तूसमोरून जाते त्याची ऑडिओ माहिती आपणास ऐकण्याची व्यवस्था केली आहे.  केम्ब्रिज विद्यापीठ म्हणजे आपल्या विद्यापीठासारखं एकाच वास्तूत नसून ट्रिनिटी कॉलेज, किंग्स कॉलेज आदी अनेक स्वायत्त कॉलेजांचा समूह म्हणजे केम्ब्रिज विद्यापीठ होय. कॅंम नदीवर ब्रिज बांधल्या मुळे याला केम्ब्रिज नाव प्राप्त झाले. इथल्या विद्यापीठांना आपल्यासारखे उठसुठ महापुरुषांची नावं देण्याची परंपरा नाही.  केम्ब्रिज विद्यापीठापासून रेल्वे स्टेशन दूर आहे. विद्यापीठ स्थापना करतेवेळी तत्कालीन विद्यापीठाच्या अधिसभेने असा प्रस्ताव मांडला की जर स्टेशन विद्यापीठाच्या जवळ बांधले तर विद्यार्थी सारखेच लंडनला जातील, अभ्यासात व्यत्यय येईल म्हणून दूर बांधले. असो. आशा अनेक छोट्या छोट्या रोचक गोष्टी आपणास केम्ब्रिज चा फेरफटका मारताना कळतात. 

आम्ही केम्ब्रिज मधील अमेरीकन  सीमेट्री मध्ये गेलो. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेतील अनेक सैनिकांना वीरगती मिळाली. त्या सर्व सैनिकाना अमेरिकेत विमानाने नेणे शक्य नसल्याने अमेरिकेने इंग्लंडला केम्ब्रिज येथे दफनभूमी साठी जागा मागितली. ती त्यांना मिळाली व एक खूप मोठे व विशाल सैनिक स्मारक अमेरिकेने केम्ब्रिज येथे बांधले. ही एक भेट देण्यायोग्य जागा आहे. ही जागा  अमेरिकन सरकारची आहे, तिथे या सैनिकांना आदरांजली देणारी व माहिती देणारी ध्वनिचित्रफीत लावली असून तेथील अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली. माहिती देताना तो अधिकारी भावुक झाला व त्याचा डोळ्याच्या कडा पाणावलेल्या मी पहिल्या. युद्धानंतर अनेक वर्षांनी देखील त्याला त्याच्या मातीचे रक्षण करताना धारातीर्थी पडलेल्या सैनिकांची आठवण येते. आमच्याकडे मात्र या तोडीचं एकही स्मारक नाही. नाही चिरा नाही पणती.

फोटो 2

 
पुढे आम्ही सेजविक म्युझियम ऑफ जिओलॉजी पाहिले. हे भूगर्भ शास्त्रावरील अप्रतिम संग्रहालय आहे. हे केम्ब्रिज विद्यापीठाच्या भूगर्भ शास्त्र विभागाचे संग्रहालय असून त्याची देखभाल या विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी करतात. या संग्रहालयात चार्ल्स डार्विनच्या अनेक दुर्मिळ पत्र व वस्तूंचा संग्रह आहे. त्याच्या प्रसिध्द "बिगल" या जहाजावरील समुद्र प्रवासात संग्रहित केलेल्या वस्तू व निरीक्षणे नीट जपून ठेवले आहेत. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून कोणते जीव प्रगत झाले याचे खूप सुंदर प्रदर्शन आत आहे. ते भेट दिल्याशिवाय कळणार नाही. 

म्युझियम ऑफ अरकिऑलॉजी व अंथ्रोपोलॉजी, म्युझियम ऑफ झुलॉजी, व्हीपल म्युझियम ऑफ हिस्ट्री ऑफ सायन्स ही पण केम्ब्रिज चे भूषण आहे. डॉ बेडेकरांनी किंग्स कॉलेज चॅपेल दाखवली. हे एक अवाढव्य चर्च असून स्थापत्यशास्त्र चा एक अजोड नमुना आहे. इथल्या प्रत्येक चर्च मध्ये त्या वास्तुबद्दलचा इतिहास प्रदर्शनाच्या माध्यमातून खूप रोचकपणे लावलेला असतो व त्याला काही पौंड शुल्क असते. 

किंग्स कॉलेज ची स्थापना 1441 साली राजा हेन्री चौथा याने केली. या चॅपेल च्या इतिहासाबद्दल एक स्वतंत्र लेख लिहिला येईल तूर्तास या कॉलेजमध्ये भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर शिकले एवढी माहिती पुरेशी आहे. एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात येत राहते व ती म्हणजे या विद्यापीठांची सुरुवात एकतर चर्च मध्ये झाली व धर्मप्रसार करण्याचे ध्येय उरी बाळगून झाली.  डॉ बेडेकर ज्या त्रिव्हिएम व कोड्रिव्हिएम चा उल्लेख करतात तो या शिक्षणाचा गाभा. (Trivium= Grammar,  Rhetoric, Logic/ Quadrivium= Arithmetic, geometry, astronomy ,music) वरील ज्ञानशाखा या अभ्यासाच्या केंद्रस्थानी होत्या. भारतीय शास्त्र परंपरेत याला वेदांग म्हणता येतील. शिक्षा, कल्प, छंद, व्याकरण, निरुक्त व ज्योतिष अशी 6 वेदांगे होत. प्रत्येक महाविद्यालयाचे 4 मुख्य भाग पडतात: वसतिगृह, भोजनगृह, ग्रंथालय व प्रार्थनास्थळ. सहसा मुलं निवासी असतात व गुरूच्या सोबत राहतात. भारतीय गुरुकुल पद्धतीशी साम्य जाणवले. 

ट्रिनिटी कॉलेज हे केम्ब्रिज विद्यापीठातील अत्यंत महत्वाचे ठिकाण. आयझॅक न्यूटन, लॉर्ड रुदरफोर्ड, फ्रान्सिस बेकन, लॉर्ड मेकॉले, श्रीनिवास रामानुजन तसेच इंग्रजी साहित्यातील जॉर्ज हरबर्ट, अँड्र्यू मार्व्हल, लॉर्ड टेनिसन, जॉन ड्रायडन, लॉर्ड बायरन इत्यादी महनीय कवी इत्यादी महान व्यक्ती ट्रीनिटी कॉलेजमध्ये शिकले तर प्रख्यात अर्थतज्ज्ञ व नोबेल विजेते अमर्त्य सेन इथे काही काळ प्राचार्य राहिले. एकट्या ट्रीनिटी कॉलेजने 32 नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ  इंग्लंडला दिले असून एका महाविद्यालयाने नोबेल साठी दिलेला हा अववल बहुमान आहे. भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन इथेच शिकले.डॉ आगरकरांनी केम्ब्रिज विद्यापीठाची माहिती दिली. श्रीनिवास रामानुजन या थोर गणिताची ह्रदयंगम कथा डॉ आगरकरांनी ट्रीनिटी कॉलेजच्या प्रवेश द्वारावर सांगितली.

 त्यांच्यावर आलेला The Man Who Knew Infinity हा चित्रपट ट्रिनिटी कॉलेज मध्येच चित्रित झाला. माझ्या 2016 सालच्या लंडन दौऱ्यावर असताना कृष्णा शर्मा नावाच्या एका भारतीय विद्यार्थ्यांची ओळख झाली. तो ट्रिनिटी कॉलेजचा विद्यार्थी. याही वर्षी त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना ट्रीनिटी कॉलेज च्या आतून फेरफटका मारला . आत हिरव्या कंच गवताने प्रफुल्लित झालेल्या विस्तीर्ण प्रांगणात फिरताना कृष्णा शर्मा म्हणाला की , "तुम्ही ज्या रस्त्यावरून चालत आहात त्यावरून न्यूटन आदी अनेक शास्त्रज्ञ एकेकाळी चालले आहेत" माझ्यासह सर्व विद्यार्थ्यांना तो एक परमोच्च क्षण होता. ट्रीनिटी कॉलेजच्या चॅपेल मध्ये लॉर्ड टेनिसन या प्रख्यात इंग्रजी कवीचा खूप छान पुतळा आहे. तिथे मला  एक इंग्रजीचा विद्यार्थी व शिक्षक म्हणून खूप छान वाटलं. या कॉलेजच्या संदर्भात एक स्वतंत्र लेख लिहिता येईल. या कॉलेजचा मागच्या भागात थेम्स नदी वाहते . इथे  पंटींग करतात. पंटींग म्हणजे छोट्या शीड वजा जहाजात बसून पूर्ण केम्ब्रिज चा पाण्यातून मारलेला फेरफटका. हातात एक मोठा दांडा घेऊन हातानी जहाज ढकलत नेणाऱ्यांना इकडे पंटर म्हणतात. आपल्याकडील पंटर जरा वेगळे!

फोटो 3

केम्ब्रिज मध्ये आम्ही फिट्झ विल्यम म्युझियम ला भेट दिली. हे एक अप्रतिम संग्रहालय आहे. प्राचीन वस्तू, नाणे, चित्र व कला यांचा अजोड संग्रह येथे आहे. भारतीय विद्यापीठांनी वस्तुपाठ घ्यावा अशी ही वास्तू . केवळ परीक्षा घेणे व निकाल उशिरा लावण्यासाठी विद्यापीठ नसून ज्ञानशाखा च्या सर्व दृष्टीने विकास घडवण्यासाठी असतात. विद्यापीठाच्या प्रत्येक विभागाचे एक संग्रहालय आहे व त्याची जबाबदारी तेथील विद्यार्थी व प्राध्यापक आनंदाने सांभाळतात.

केम्ब्रिज च्या भेटीनंतर आम्ही ऑक्सफर्ड येथे दोन दिवस युथ हॉस्टेल मध्ये मुक्कामी होतो. डॉ बेडेकरांनी ऑक्सफर्ड चा कानाकोपरा अनेकदा पिंजून काढला असल्यामुळे व ते तेथील जवळपास सर्व ग्रंथालयाचे सभासद असल्याने आम्हा सर्वांना खूप विशेष वागणूक मिळाली. ऑक्सफर्ड येथील ब्रॉड स्ट्रीट वर आम्ही फेरफटका मारला . सर्व महत्वाची महाविद्यालये या रस्त्यावर आहेत. 12 व्या शतकात जिथे ऑक्सफर्ड विद्यापीठ सुरू झालं त्या युनिव्हर्सिटी चर्च मध्ये आम्ही गेलो. तिथे विल्यम जोन्स भारतीय पंडितांना शिकवतोय असे एक शिल्प आहे. यारून इंग्रजांच्या वसाहतवादी मानसिकतेचा प्रत्यय येतो. याच रस्त्यावर चालत जाताना डॉ बेडेकरांनी एक क्रॉस दाखवला. इथे 1555-56 साली थॉमस क्रमर, निकोलस रिडली व ह्युज लॅटिमर या तीन प्रोटेस्टंट ख्रिश्चन व्यक्तींना जीवन्त जाळण्यात आले होते.  राणी मेरी हिने सम्पूर्ण इंग्लडला कॅथलिक ख्रिश्चन करण्याचा विडा उचलला होता पण वरील तीन प्रोटेस्टंट व्यक्तींनी तिला विरोध केला म्हणून त्यांना जीवन्त जाळण्यात आले. नवल याचं वाटतं की इंग्रजांनी भारतात येऊन सभ्यता व संस्कृती भारतीयांना शिकवायचा प्रयत्न केला , जे भारतीय कमालीचे सहिष्णु होते. दैवदुर्विलास, दुसरे काय

फोटो 4

ऑल सोल कॉलेज, रेडक्लिफ केमेरा, शेलडोनियन थिएटर, बॉडलीयन लायब्ररी अशा अनेक वास्तू पाहत आम्ही "इंडियन इन्स्टिट्यूट" नावाच्या वास्तुसमोर उभे होतो. डॉ बेडेकरांनी त्या वास्तूची इत्थंभूत माहिती दिली. मॉनेर विलीयम्स या थोर संस्कृत विद्वानाने ही वास्तू उभारण्यात मोलाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे या वस्तूच्या प्रवेशद्वारी संस्कृतमध्ये लिहिलेला ताम्रपट आहे. तो असा 

फोटो 5

वरील संस्कृत श्लोक मॉनेर विल्यम्स ने लिहिले असून प्राच्यशास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी व आंग्ल व आर्य भूमीची मैत्री वाढावी म्हणून ही वास्तू उभारत असल्याबद्दल लिहिलं आहे. राजा एडवर्ड अलबर्ट याने या वास्तूची कोणशीला ठेवली. भारतात आयसीएस म्हणजे सध्याच्या आयएएस अधिकारी बनवायच्या आधी इंग्रज अधिकारी इथे येउन भारतीय संस्कृती आणि भाषा शिकत. एखाद्या देशावर केवळ सैन्य आक्रमण करून जिंकता येत नाही तर त्या देशातील धर्म, भाषा आणि संस्कृती चा सांगोपांग अभ्यास करून वैचारिक गुलामगिरी करायला भाग पाडता  येते हे ब्रिटिश सरकारने करून दाखवले. आम्ही मात्र आमच्यात भांडत बसलो. 
नंतर आम्ही हिस्ट्री ऑफ सायन्स म्युझियम, पिट्स रिव्हर्स म्युझियम, अशमोलीयन म्युझियम पाहिलं. हा परत स्वतंत्र लेखाचा विषय होईल. 1621 साली हेन्री डेनवर ने औषधी वनस्पती चा अभ्यास करण्यासाठी उभारलेल्या  बोटॅनिकल गार्डनला आम्ही भेट दिली. जगभरातील जवळजवळ 6000 वनस्पती इथे आहेत. सुंदर फुलांपासून ते अनेक दुर्मिळ वनस्पती प्रजाती इथे काळजीपूर्वक वाढवल्या आहेत. दोन दिवसात खरंतर काहीच पाहून होत नाही. इथे एखादं वर्षभर तरी सम्पूर्ण पहायला लागेल अशी अवस्था होते. 

अभ्यास दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही लंडनला मार्गस्थ झालो. मुंबईत फोर्ट परिसरात गेल्यास  जसं वाटतं तसं लंडनमध्ये गेल्यास वाटतं. आमचा मुक्काम इंडियन वायएमसीए होस्टेलवर 4 दिवस होता. हे वसतिगृह लंडनच्या अगदी मध्यवर्ती भागात आहे. इथून आम्ही ट्युबस ( लोकल ट्रेन) मधून प्रवास करत लंडनमधील महत्वाच्या वास्तू व संग्रहालये पहिली. लंडन मध्ये ब्रिटिश म्युझियम, ब्रिटिश लायब्ररी हे दोन मानबिंदू पाहिले. चार्ल्स डार्विन या थोर संशोधकाच्या घरी गेलो होतो. मानवाच्या उत्क्रांती चे सिद्धांत मांडणाऱ्या डार्विनचे 22 एकराच्या विस्तीर्ण जागेतले घर ब्रिटिश सरकारने स्मारक म्हणून घोषित केले आहे. डार्विनच्या घरी असलेल्या प्रदर्शनात डार्विनच्या  समुद्रसफरी बद्दल डॉ आगरकर मुलांना भरभरून बोलले.

जगाची प्रमाणवेळ ज्या ग्रिनीच मेरेडियन वरून ठरते तिथे जाऊन आलो. जगाला विभागणारी ग्रीनिज मिन लाईन इथून जाते, या रेषेवर उभा राहिल्यास एक पाय दक्षिण गोलार्धात तर दुसरा पाय उत्तर गोलार्धात ठेवता येतो. या रेषेवर जगभरातील मुख्य शहरांचे अचूक ठिकाण गणितीय परिभाषेत कोरले आहे. घड्याळाची निर्मिती कशी झाली व ग्रहांचे अचूक निरीक्षण करून वेळ मोजणारे जे घड्याळ आज आपण मनगटावर मिरवतो त्याचा रोचक प्रवास कसा झाला याचे एक सुंदर प्रदर्शन ग्रीनिज ला आहे. इथेच नॅशनल मेरिटाईम म्युझियम आहे. डॉ आगरकर आमच्यासोबत होते.  ग्रीनिज वेधशाळेची इथंभूत माहिती डॉ आगरकरांनी दिली. 

 दुसऱ्या दिवशी आम्ही ट्राफलगर चौकात गेलो जिथे नेल्सनचा मोठा पुतळा उभा केला आहे. नेल्सननी नेपोलियन ला युद्धात हरवले व तो इंग्रजांचा राष्ट्रीय शौर्याचे प्रतीक बनला. नेल्सनचा पुतळ्याचे शिल्प असे बनवले आहे की त्याची दृष्टी ब्रिटिश पार्लमेंटवर राहील. त्याच परिसरात ब्रिटिश पार्लमेंट आहे. याच चौकात  नेपियर व हॅवलोक या दोन ब्रिटिश जनरल्सचे अश्वारूढ पुतळे आहेत. एकाने भारताचा सिंध प्रांत काबीज केला तर एकाने लखनऊ. भारतातील महत्वाच्या दोन प्रांतांना काबीज केल्यामुळे नेपियर व हॅवलोक या दोघांना इंग्रजांनी नेल्सनच्या बरोबर सन्मान दिला. त्या पुतळ्यांच्या खाली लिहिलं आहे की हे पुतळे लोकांनी पैसे जमा करून सर्वांच्या आर्थिक सहकार्यातून उभारले आहेत. सरकार इथे पुतळे बांधत नाही. ब्रिटिश देशप्रेमी व कडवे सैनिक आहेत हे या चौकात गेल्यावर कळते. या चौकातच मागच्या बाजूला रॉयल आर्ट गॅलरी असून जगभरातील उत्तमोत्तम कला प्रदर्शन इथे भरते. इथे एका चौथऱ्यावर देशातील सर्वोत्तम कलाकृती लोकांच्या प्रदर्शनासाठी लावण्यात येते. जगभरातील कलाप्रेमींची ही पंढरी.  टॉवर ऑफ लंडनजेथे आपला कोहिनुर हिरा ठेवलाय , बकिंगहॅम पॅलेस जिथे राणी राहते व बिग बेन, ब्रिटिश पार्लमेंट, लंडन आय आदी ठिकाण आम्ही पहिली. यावेळी लंडन मध्ये एका आगळ्यावेगळ्या लग्नाची चर्चा सुरू होती ते म्हणजे प्रसिद्ध हॉलिवूड नटी मेगन मार्कल व ब्रिटनचा राजकुमार यांच्या लग्नाची.  आम्हाला निमंत्रण नव्हतं म्हणून तिकडे गेलो नाही. उगीच पंक्तीप्रपंच नको म्हटलं. लंडनला जाताय म्हणजे केवळ मजा मारायला वा हुंदडायला नसून शिकण्यासारख्या खूप गोष्टी इथे आहेत. रस्त्यावर असलेली शिस्त, नियम पाळणे व राष्ट्रीयता या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. 

भारतीय क्रांतिकारकांनी इंग्लडच्या मातीत राहून  देशाच्या स्वातंत्र्यासाठी काम केलं त्यांच्या स्मृती ताज्या करण्यासाठी आम्ही त्यात्या ठिकाणी भेटी दिल्या त्यात विलक्षण म्हणजे वीर सावरकर लंडनमध्ये ज्या इंडिया हाऊस मध्ये विद्यार्थी असताना राहत होते तिथे आम्ही गेलो, टिळक इंग्रज सरकारने त्यांच्या वर केलेल्या खटल्याला उत्तर द्यायला लंडनमध्ये ज्या वास्तूत राहिले , जिथे मदनलाल धिंग्रा यांनी करझन वाईली ला गोळ्या झाडल्या ती जागा अशा  अनेक....

या इंग्लंड दौऱ्यात रोजनिशी वाचन हा एक फार छान उपक्रम असतो. प्रत्येकाला रोजची डायरी लिहावी लागते व त्याचे सामूहिक वाचन होते. या वेळी मास मीडिया विभागाचे चार विद्यार्थी सोबत असल्याने सम्पूर्ण सहल डीएसेलार कॅमेरा व ट्रायपॉड च्या मदतीने रीतसर छायांकित झाली. लवकरच त्याची ध्वनिचित्रफीत बनवण्याचा मानस आहे. 

 
आमची शैक्षणिक सहल 25 मे रोजी सम्पली. सर्व विद्यार्थ्यांना हिथ्रो विमानतळावर सोडले. मी मात्र डॉ बेडेकरांसोबत आठ दिवस अधिक राहिलो.शेक्सपिअर चे स्ट्रेटफर्ड अपॉन एव्हन व सेंट पॉल अशा स्थळांना भेटी दिल्या. एक गोष्ट जाणवत राहिली की संत तुकाराम, शेक्सपिअर व शिवाजी महाराज हे समकालीन. ज्या दिमाखात शेक्सपिअर चे स्मारक त्याच्या जन्मस्थानी मिरवते त्याच्या एक दशांश सुध्दा भारतात आपण तुकारामादी संतांची व त्यांच्या वाङ्मयाची किंमत करत नाही.  शिवाजी महाराजांचे किल्ले सध्या ज्या अवस्थेत पडून आहेत ते पाहून दुःख होतं. इंग्लडच्या प्रत्येक नागरिकास त्याच्या परंपरेचा कडवा अभिमान आहे आणि आपण आजही प्रतिकात गुंतलो आहोत. अभ्यास, संशोधन व सांस्कृतिक वारसा यात आपली परंपरा उज्जवल असली तरीही सध्याच्या घडीला आपण कोसो दूर आहोत. 

फोटो 6

आमचा मुक्काम डॉ मधुकर आंबेकर व डॉ विदुला आंबेकर या पेशाने डॉक्टर  दाम्पत्याकडे नॉर्थवूड येथे झाला. आंबेकर प्रभृती हे मागच्या 40 वर्षांपासून लंडन निवासी आहेत.  आपली संस्कृती जपुन ठेवुन इंग्लंड मध्ये काम करणारी डॉ आंबेकर व सौ आंबेकर सारखी दाम्पत्य दुर्मिळच . त्यांच्या घरी अस्सल मराठी पदार्थ वरणफळे, उपमा, पुरणपोळी इ. चोखंदळपणे आस्वाद करता आली.  इथल्या भारतीय लोकांशी यांचं जिव्हाळ्याच नातं. त्यांनी माझे व डॉ बेडेकरांनी दोन व्याख्यान आयोजित केली.  लंडनमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी " Western Scholars of Upanishads" या विषयावर बोलण्याचा योग आला. हा विषय डॉ बेडेकरांनी मला सुचवला होता.  व्याख्यानं चांगली झाली. डॉ बेडेकर "Manipulation of Indian Education in 19th Century" या विषयावर बोलले. डॉ बेडेकरांनी व्याख्याना संदर्भात केलेल्या सूचना खूप फलद्रुप झाल्या. अभ्यासास वेगळे विषय मिळत गेले व माउलींनी म्हटल्याप्रमाणे "जे चालते ज्ञानाचे बिंब" अशी प्रचीती येत गेली. शेवटी आपल्या संवेदनांचा परीघ अधिकाधिक व्यापक बनवणे म्हणजेच माणूस म्हणून मोठं होणे.

 तुकोबा म्हणाले आहेतच की :

संकोचोनी काय झालाशी लहान।
घेई आपोषण ब्रह्मांडाचे।।

अनुभवांनी खूप समृद्ध होता आलं .....

--------प्रा प्रशांत पुरुषोत्तम धर्माधिकारी



परममित्र प्रकाशनाच्या श्री माधव जोशी यांचं दु:खद निधन

परममित्र प्रकाशनाचे PARAM MITRA Publications  श्री माधव जोशी यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे.  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ...